नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने खासगी शिवशाही बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकमधून एकुण सहा बसेस रवाना करण्यात आल्या तर पुणे येथूनही तीन बसेस नाशिकला आल्या. मात्र प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने दिवसभरात केवळ २१० प्रवाशांनीच प्रवास केला.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर प्रवाशांच्या सेायीसाठी राज्य परिवहन महामंडळाने खासगी शिवशाही बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार प्रत्येक आगारातून दरराेज किमान दहा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार नाशिकमधून गुरुवारी धुळे आणि पुणे येथे प्रत्येकी एक बस रवाना करण्यात आली तर शुक्रवारी देखील या मार्गावर एकूण सहा बसेस रवाना करण्यात आल्या. मात्र संपामुळे प्रवाशांमध्ये काहीसी साशंकता असल्याने शिवशाहीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या अत्यल्प असल्याचे दिसून आले. दिवसभरात केवळ २१० प्रवाशांनीच शिवशाहीतून प्रवास केला तर दुसरीकडे खासगी प्रवासी वाहनांचा प्रतिसाद कायम राहिला.
शुक्रवारी नाशिक आगारातून धुळे आणि पुणेसाठी प्रत्येकी तीन बसेस रवाना करण्यात आल्या. सकाळी ११.३० वाजता पुण्याकडे पहिली बस सोडण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बसेस रवाना करण्यात आल्या असून या बसेसला नाशिकमधून जातांना कोणतीही अडचण निर्माण करण्यात आली नसल्याचे एस.टी.च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नाशिक-धुळेसाठी तीन बसेस सोडण्यात आल्या त्यामथून ७५ प्रवाशांनी प्रवास केला तर नाशिक-पुणे तीन शिवशाही बसेस मधून १३५ प्रवाशांनी प्रवास केला. पुणे येथूनही नाशिकसाठी सहा बसेस सोडण्यात आल्या होत्या. पुण्यातून सर्वाधिक बसेस नाशिकला पोहचल्या असल्यातरी त्यामधून अवघ्या ६५ प्रवाशांनीच प्रवास केला.
--इन्फो--
सिन्नरजवळ शिवशाहीवर दगडफेक
मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर बायपास रोडवरील सरदवाडी शिवारातील पुलाजवळ अज्ञातांना पुणे-नाशिक शिवशाही बसवर दगडफेक करून पलायन केले. दुकाचीवरून आलेल्या अज्ञातांनी समोरून बस येताना दिवसात दुरवरून बसवर दगड भिरकावले. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस पुढे आणल्याने बसचेही नुकसान टळले.