नाशिक : वातावरण बदलामुळे शहरात सापांचा सुळसुळाट वाढला असून, सोमवारी (दि.३०) दिवसभरात इको-एको संस्थेच्या वतीने सहा सापांना रहिवासी भागातून रेस्क्यू करण्यात आले. गरवारे पॉइंटवरील एका इमारतीच्या आवारातून जाळीमध्ये अडकलेला घोणस जातीचा साप तर इंदिरानगरमधील वडाळा-पाथर्डी रस्त्यावर एका लॉन्समधून धामण जातीचा सर्प रेस्क्यू या संस्थेच्या सर्पमित्रांकडून करण्यात आला. तसेच उपेंद्रनगरमधील एका बंगल्याच्या पाठीमागे संरक्षण भिंतीच्या आतील बाजूने बसलेली धामण पकडण्यात आली. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील शनिमंदिराच्या परिसरात असलेल्या एका बंगल्यातही धामण निघाल्याची घटना घडली. त्याचप्रमाणे हिरावाडीमधील तांबोळीनगर परिसरातील एका सदनिकेत घोणस जातीचा अत्यंत विषारी जातीचा साप आढळून आला. एकूणच दिवसभरात सहा ते सात साप रहिवासी परिसरातून वेळीच ‘रेस्क्यू’ करण्यात आले. घोणसचा प्रजनन काळ सध्या घोणस जातीच्या सर्पाचा प्रजनन काळ सुरू असून, थंडीच्या चार महिन्यांपर्यंत हा कालावधी असतो. त्यामुळे घोणस हा सर्प बिळाबाहेर येण्याचे प्रमाण वाढते. तसेच जमिनीमध्ये मुरलेल्या पावसाच्या पाण्याची उन्हाच्या तीव्रतेने वाफ होण्यास सुरुवात झाली असून, जमिनीखाली उष्णता वाढू लागल्याने सर्प या हंगामात बिळ सोडून बाहेर पडतात.
शहरात बारा तासांत सहा साप ‘रेस्क्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 1:12 AM