नाशिक : वाढदिवसानिमित्त दरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसमध्ये पार्टीच्या वेळी नशेच्या धुंदीत झिंगलेल्या दहा ते पंधरा संशयित गुंडांनी मिळून साउंडसिस्टिम वाजविणाऱ्या दोघा तरुणांना लक्ष्य करत अमानुष मारहाण व लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा संशयितांना अटक केली आहे.फार्महाउसमध्ये पंचवटीतील एका ‘बॉस’च्या वाढदिवसानिमित्त ओली पार्टी रंगविताना गुरुवारी (दि.९) संध्याकाळपासून पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यधुंद अवस्थेत धिंंगाणा घातला गेला; मात्र याचा कुठलाही मागमूस रात्रपाळीच्या गस्तीवर असणाºया तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला लागला नाही, हे विशेष!पार्टीच्या वेळी दारूसह अन्यप्रकारच्या प्रतिबंधित अशा अमली पदार्थांच्या नशेत झिंगलेल्या टोळीने साउंडसिस्टिम वाजविणाºया
दोघा तरुणांना टार्गेट करत ‘साउंडची क्वॉलिटी दिली नाही, बॉसला नाराज केले’ असे सांगून कुरापत काढली. कमरेच्या पट्टय़ासह मिळेल त्या वस्तूने दोघांना अमानुष मारहाण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. एवढय़ावरच गुंडांची ही टोळी थांबली नाही, तर त्यांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखून धमकावत अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडले आणि लैंगिक अत्याचारदेखील दोघांवर केले. यावेळी काहींनी पिस्तूलमधून हवेत गोळीबारदेखील केल्याचे पीडित युवकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. हा प्रकार सोशलमीडियातून शुक्रवारी सर्वप्रथम समोर आल्यानंतर ग्रामीण पोलीस खडबडून जागे झाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य संशयित सराईत गुन्हेगार संदेश काजळे, प्रितेश काजळेसह अन्य दहा ते बारा संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह पुरुषांसोबत अनैसर्गिक अत्याचार व दंगल माजविल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याचा तपास अधिक्षक आरती सिंह यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणो यांच्याकडे सोपविला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सहा संशयितांना शनिवारी संध्याकाळी उशिरार्पयत ताब्यात घेतले होते. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. मुख्य संशयित संदेश काजळे हा अद्याप फरार असून, त्याच्या मागावर पथके रवाना केल्याचे अधीक्षक सिंह यांनी सांगितले. आरोपी राजकीय नेत्यांशी संबंधित असल्याचेदेखील सांगण्यात येत आहे.दरम्यान, पोलिसांनी या घटनेची निष्पक्ष चौकशी करत संशयित हल्लेखोरांनी जातीयवाचक शिवीगाळ केल्याचेही पीडित युवकाने सांगितले आहे, त्याआधारे तत्काळ त्यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, तसेच मोक्काची कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून अध्यक्ष संतोष सोनपसारे आदींनी निवेदनाद्वारे अधीक्षकांकडे केली आहे.
फार्महाउसची झाडाझडतीदरी-मातोरी रस्त्यावरील शिवगंगा फार्महाउसची स्थानिक गुन्हे शाखा, तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणो यांच्या उपस्थितीत झाडाझडती घेतली. फार्महाउसमधील धिंगाण्याचे विविध पुरावे यावेळी पोलिसांच्या पथकाने शनिवारी सकाळी गोळा केले. वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली धिंगाणा घालणारी हल्लेखोरांची टोळी फरार झाली, मात्र त्यापैकी सहा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.