मालेगाव : राज्यात सुमारे सहा हजार शंभर शिक्षण सेवकांची पदे भरली जाणार आहेत. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी ''पवित्र पोर्टल''च्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील आणि शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी. एल. एड. कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर ही भरती होणार आहे. डिसेंबर २०१७मध्ये आयोजित केलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ७० शिक्षणसेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ५ हजार ९७० शिक्षणसेवक आणि उर्दु माध्यमाच्या ९६६ उमेदवारांपैकी ४६६ पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी २०२०मध्ये पूर्ण झाली आहे. कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाकडील पदभरतीवगळता अन्य विभागांनी नवीन पदभरती करू नये, असे वित्त विभागाचे शासन निर्देश असल्याने ही भरती प्रक्रिया प्रलंबित ठेवण्यात आली होती.
-------------------
दुसरी अभियोग्यता परीक्षा लवकरच
शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेली शिक्षणसेवक पदभरती प्रक्रिया पदभरती बंदीतून वगळण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचे उर्दू शिक्षक संघाचे साजिद अहमद यांनी सांगितले. तसेच दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षेचे आयोजन लवकर करण्यात यावे, यासाठी अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघाचे प्रयत्न सुरू आहेत.