नाशिक : पीओपीपासून बनविलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात करण्याऐवजी घरच्या घरी करण्यासाठी महापालिकेने सहाही विभागीय कार्यालयात अमोनियम बायो कार्बोनेटची पावडर मोफत उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी अमोनियम बायो कार्बोनेटचा वापर करून पीओपी मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.महापालिकेने मागील वर्षापासून पुणे महापालिकेच्या धर्तीवर शहरातही पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी अमोनियम बायो कार्बोनेटची पावडर मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर २ टन अमोनियम बायो कार्बोनेट मागविले होते. यंदा महापालिकेने ६ टन अमोनियम बायो कार्बोनेट मागविले आहे.
दुपारी १२ वाजता मिरवणूक;२८ कृत्रिम कुंड
शहरात तसेच जिल्ह्यात गणरायाला निरोप देण्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, यंदा दुपारी १२ वाजता मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी तब्बल २८ कृत्रिम कुंड तयार करण्यात आले आहेत.नाशिकमध्ये दुपारी दोन वाजता गणेशोत्सवाची मुख्य मिरवणूक निघत असते. परंतु रात्री उशीर झाल्यानंतर ध्वनिक्षेपक बंद करावा लागतो, हे लक्षात घेऊन यंदा दुपारी बारा वाजताच मिरवणूक काढण्याचे नियोजन आहे. याशिवाय गोदावरीसह अन्य नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशमूर्तींचे दान स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. २६ नैसर्गिक जलाशयांच्या ठिकाणी ही व्यवस्था आहेच, शिवाय २८ ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. गेल्यावेळी २ लाख ३९ हजार मूर्तींचे संकलन करण्यात आले होते. यंदा त्यापेक्षा अधिक मूर्तींचे संकलन करण्याचा महापालिका आणि सेवाभावी संस्थांचा मानस आहे.