नाशिक : तोंडओळख असलेल्या एका व्यक्तीने महिला भिक्षेकरीच्या सहा वर्षीय मुलाला वडापाव खाऊ घालण्याचे आमीष दाखवून शनिवारी (दि.१) गोदाघाटावरील एका मंदिरापासून अपहरण केले होते. याप्रकरणी महिलेने पंचवटी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या गोरगरीब महिलेच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत कसोशिने तपासचक्रे फिरवून सुमारे ३०० भिक्षेकऱ्यांकडे चौकशी करत अवघ्या बारा तासांत अपहृत बालकाचा शोध घेतला व संशयित अपहरणकर्त्यास बेड्या ठोकल्या.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शनिवारी (दि.१) फिर्यादी शीतल शिरसाट (३८,रा.गोदाघाट पटांगण), यांच्या फिर्यादीवरुन त्यांचा सहा वर्षाचा मुलाला एका तोंडओळख असलेल्या संशयित राजु उर्फ रतन बबन वाघ (३८,रा.जऊळके,ता.दिंडोरी) याने ‘मी तुझ्या मुलाला वडापाव खाऊ घालून आणतो’ असे सांगून त्यांच्या रखवालीतून पळवून नेले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरिक्षक युवराज पत्की गुन्हे शोध पथकाचे सत्यवान पवार यांच्या पथकाने शोध घेण्यास सुरुवात केली. फिर्यादीच्या सांगण्यावरुन संशयिताच्या उजव्या हाताच्या अंगठ्या शेजारील बोट अर्धे तुटलेले दिसले एवढीच बाबत पोलिसांकडे संशयित अपहरणकर्त्याबाबत होती. यावरुन पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. दिवस-रात्रपाळीतील गुन्हे शोध पथकाने हा टास्क हाती घेत छडा लावण्याचा संकल्प सोडला. गंगाघाट, तपोवन, अमरधाम, जुने नाशिक परिसरातील सुमारे तीनशेपेक्षा अधिक भिक्षेकरुंकडे पोलिसांनी जाऊन चौकशी केली. दरम्यान, संशयित राजु हा पंचवटीतील निमाणी आणि जुन्या नाशकातील दुधबाजारात दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दुधबाजार गाठले असता तेथे संशयित आरोपी राजु वाघ हा एका बाळासोबत आढळून आला. त्यास ताब्यात घेत पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून बाळाची सुखरुप सुटका करत पोलिसांनी मातेची बाळासोबत पुर्नभेट घडवून आणली. पोलिसांनी राजु वाघविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.