अझहर शेख,
नाशिक : वन्यजिवांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना होत असल्याचे सांगितले जाते, तसेच वन्यजीव संवर्धनासाठी गावपातळीवर जागर केला जात असला तरी नाशिक जिल्ह्याने मागील सहा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांना गमावले आहे. यामध्ये १११ बिबटे, ३८ काळवीट, २० तरस आणि २१ हरणांचा डिसेंबरअखेरपर्यंत विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
नाशकातील पूर्व आणि पश्चिम वन विभागाच्या हद्दीत विविध कारणांमुळे वेगाने संपुष्टात येणाऱ्या नैसर्गिक अधिवासामुळे भक्ष्याच्या शोधात वन्यप्राण्यांना करावी लागणारी भटकंती आणि दिवसेंदिवस बिघडत जाणारी अन्नसाखळी यामुळे कधी रस्ते अपघातात, तर कधी नदी, नाले, विहिरींमध्ये बुडून वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागल्याचे दिसून येते. नाशिक पूर्व-पश्चिम वन विभागाच्या प्रत्येक तालुक्यात वन्यजिवांचा विविध कारणांमुळे बळी जात आहे. नाशकात मागील पाच वर्षांमध्ये बिबट्यांची संख्या वाढल्याची एकीकडे ओरड होत असली तरी दुसरीकडे नैसर्गिकरीत्या, तसेच विविध अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्या बिबट्यांचा आकडाही तितकाच चिंताजनक आहे.
२०१४ सालापासून तर २०२० अखेर नाशकात एकूण १११ लहान-मोठे बिबटे मरण पावले आहेत, तसेच पूर्व भागात काळवीट आणि हरणांच्या मृत्यूचे प्रमाणही गंभीर आहे. मागील वर्षभरात काळविटाचे मृत्यू रोखण्यास वन विभागाला काहीअंशी यश आले आहे. गेल्या वर्षी पाच काळविटांसह एक हरिण मृत्युमुखी पडले. तत्पूर्वी, २०१४ पासून २०१९ सालापर्यंत ३१ काळविटांनी प्राण गमावला. रस्ते अपघात, पाण्याच्या शोधात उघड्या विहिरींमध्ये कोसळून, तसेच रेल्वे अपघात अन् शहरी भागातून ग्रामीण भागात नेऊन सोडल्या जाणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांत काळवीट अन् हरणांचा बळी गेल्याची नोंद वनाखात्याच्या दप्तरी आहे.
---इन्फो---
पूर्व- पश्चिम भागात मृत्युमुखी पडलेले वन्यजीव असे...
बिबटे- १११
काळवीट- ३८
तरस- २०
हरिण- २१
कोल्हे- १७
मोर- ३६
लांडगे- २
उदमांजर- ६
गिधाड- १
कासव- २
---इन्फो--
२९ बिबटे, १५ तरस वाहनांच्या धडकेत ठार
भरधाव वाहनांच्या धडकेत वन्यजिवांचा नाहक जीव जात आहे. राखीव वनक्षेत्र तसेच वन्यजिवांचा वावर असलेल्या परिसराजवळून जाणारे, राष्ट्रीय, राज्य महामार्ग, तसेच अंतर्गत रस्ते आणि दिवसेंदिवस वाढती वाहनांची संख्या यामुळे वन्यजिवांना रात्रीच्या वेळी रस्ता ओलांडताना आपला प्राण गमवावा लागत आहे. ‘रोडकिल’ ही समस्या अत्यंत भीषण बनू पाहत आहे. जिल्ह्यात मागील सहा वर्षांत २९ बिबटे अज्ञात वाहनांच्या धडकेत ठार झाले, तसेच १५ तरसांनाही रस्त्यावर प्राण सोडावा लागला आहे.
--इन्फो--
शिकारीवर नियंत्रण
वन विभागाला काळवीट, हरिण तसेच मोरांची शिकार रोखण्यास यश आले आहे. वन्यजिवांच्या शिकारीचे प्रमाण मागील तीन वर्षांमध्ये तसे कमी राहिले असून, ही दिलासादायक बाब आहे. मागील वर्षी एका काळविटाची शिकार केली गेल्याची नोंद पूर्व वन विभागाकडे आहे.
----
फोटो आर वर ०२वाइल्डलाइफ / ०२वाइल्डलाइफ१ नावाने
===Photopath===
020321\02nsk_56_02032021_13.jpg~020321\02nsk_57_02032021_13.jpg
===Caption===
जागतिक वन्यजीव दिन~जागतिक वन्यजीव दिन