घोटी : सरासरी ३५०० मिलिमीटर पावसाची नोंद होणाऱ्या इगतपुरी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधारेने थोडीही उसंत न दिल्याने विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने अवघ्या महिन्याभरात सन २००७चा विक्रम मोडीत काढत सरासरीच्या साठ टक्के पाऊस झाला असल्याने तालुक्यात नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.गेली चार दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला असून, या पुराचा फटका तालुक्यातील जनजीवनावर झाला असल्याचे दिसून येते. या पुराच्या पाण्यात घोटी-भगूर रस्त्यावरील वंजारवाडीजवळील महत्त्वाचा पूल गेल्याने या भागातील बेलगाव कुऱ्हे, कुऱ्हेगाव, नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन व वंजारवाडी आदि गावांचा भगूर शहराशी संपर्क तुटला. परिणामी या गावातील नागरिकांना भगूरला जाण्यासाठी महामार्गाला वळसा मारून येण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)
इगतपुरी तालुक्यात सरासरीच्या साठ टक्के पाऊस
By admin | Published: August 04, 2016 12:59 AM