सातपूर : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रभाग क्रमांक 11 मधील प्रबुद्धनगरात लवकरच सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्यात येईल असे आश्वासन प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांनी नागरिकांना दिले. प्रबुद्धनगर रोहिदास चौकातील सार्वजनिक शौचलायच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. याबाबत माजी नगरसेविका ज्योती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी प्रभाग सभापती रवींद्र धिवरे यांची भेट घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली होती.
धिवरे यांनी बांधकाम उपअभियंता संजय पाटील,ड्रेनेज विभागाचे धिवरे, विभागीय स्वछता निरीक्षक माधुरी तांबे,नगरसेवक योगेश शेवरे,विभागीय अधिकारी नितीन नेर आदी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी जाऊन पाहणी केली.प्रबुद्धनगरात जवळपास दहा हजार लोकसंख्या असून कष्टकरी व दरिद्ररेषेखालील नागरिक राहतात.या वसाहतीत अनेक नागरी समस्या आहेत.संत रोहिदास चौकातील सार्वजनिक शौचालयांची अतिशय दुरवस्था झाली आहे.
शौचालयाची भांडे तुटलेली आहेत.दरवाजेही मोडकळीस आलेले आहेत.त्यामुळे नागरिक उघड्यावर शौचालयाचा जात आहेत.सध्या कोरोना सारखा भयंकर महामारीत सरकार अनेक उपाय योजना करत असताना प्रबुद्ध नगर सारख्या परिसरात मूलभूत सुविधाचा अभाव आहे.परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे तसेच शौचालया जवळील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि शौचालय धोकादायक झाल्याने महिला,वृद्ध व लहान मुलांची गैरसोय होत आहे.त्वरित नवीन शौचालय उभारुन गैरसोय दूर करावी.अशी मागणी बजरंग शिंदे,ज्योती शिंदे,कैलास सोनवणे,देविदास अहिरे, संतोष जाधव,ज्ञानेश्वर वाटावे,अशोक वाव्हळ,रामदास पालवे,गणेश झनकर,हरीश सोनवणे,देवराम पगारे,रमेश तुपसौन्दर,दिनेश गोटे,प्रमोद वाघमारे,रवी मोरे,सोनाभाऊ गांगुर्डे,विठ्ठल साळवे,रमेश जाधव,रंगा पवार आदींसह नागरिकांनी केली.
प्रबुद्धनगर नगरातील सार्वजनिक शौचलायच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने पाहणी करतांना प्रभाग सभापती रवींद्र धिवरे समवेत बजरंग शिंदे,ज्योती शिंदे,कैलास सोनवणे,देविदास अहिरे, संतोष जाधव, ज्ञानेश्वर वाटावे,अशोक वाव्हळ,रामदास पालवे आदींसह अधिकारी.