नाशिक : चामरलेणी राखीव वनक्षेत्रात वृक्षतोड्यांकडून सर्रासपणे घुसखोरी करत झाडांची कत्तल केली जात असल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या वनक्षेत्रातील वृक्ष कापण्याचा सपाटा अज्ञात लोकांनी लावल्यामुळे वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. राखीव वनक्षेत्र असूनदेखील या भागात सर्रास कुºहाड चालविली जात असून, वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे जागरूक नागरिकांनी सांगितले.चामरलेणी परिसर नैसर्गिक, धार्मिक स्थळ असून, या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा बहरलेली आहे. पावसामुळे या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. यामुळे या भागात मोठ्या संख्येने नागरिक ये-जा करू लागले आहे. तसेच सकाळ-संध्याकाळच्या सुमारास या भागातील रहिवासी फेरफटका मारण्यासाठी या परिसराला पसंती देतात. मात्र मागील काही दिवसांपासून या भागात वृक्षांवर काही लाकूडतोड्यांकडून घाव घातला जात आहे. पंधरवड्यापासून या भागात वृक्ष कापणारी टोळी सक्रिय झाली असून, अद्याप २० ते २५ झाडांवर अज्ञात संशयितांकडून कुºहाड चालविली जात आहे. याकडे वनविभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा या भागातील वृक्षराजी संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. चामरलेणी परिसराचा फेरफटका मारला तर या भागात राखीव वनक्षेत्रात ग्लिरिसिडीया, सुबाभूळ, गुलमोहर यांसारख्या प्रजातींची झाडे अधिक आढळून येतात. या भागात भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड करणे गरजेचे आहे.राखीव वनक्षेत्राला नुकसान पोहचविणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. तरीदेखील या भागात सकाळी तसेच दुपारी किंवा सायंकाळी सर्रासपणे घुसखोरी करत झाडे कापली जात आहेत. एकीकडे वृक्षाच्छादित क्षेत्रवाढीसाठी ३३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम वनमहोत्सवांतर्गत शासनाकडून राबविला जात असून, दुसरीकडे वाढलेल्या झाडांच्या संवर्धनाबाबत मात्र प्रशासनाला अपयश येत असल्याने जनसामान्यांमध्ये वेगळाच संदेश जात आहे. वनविभाग नाशिक पश्चिमकडून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.चामरलेणीचा संपूर्ण परिसर राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात कुठल्याही प्रकारे नुकसान पोहचविणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. वृक्षतोडीसारखा गंभीर प्रकार खपवून घेतला जाणार नाही. वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जाणार असून, या भागावर वनविभागाच्या गस्ती पथकाचे लक्ष आहे. वृक्षतोड करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.- रवींद्र भोगे, वनपरिक्षेत्र अधिकारी
चामरलेणी येथे वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:06 AM