नाशिक जिल्ह्यात वनविभाग प्रादेशिककडून १ हजार १७४ हेक्टर इतक्या जागेत २१लाख ६ हजार १७० रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे प्रशासनाने ठेवले आहे. यामध्ये पूर्व विभाग ४५२ हेक्टरवर तर पश्चिम विभागाकडून ३१० हेक्टरवर वृक्षारोपण करणार आहे. वृक्षारोपणाची तयारी पुर्ण झाली असून, रोपांच्या उपबलब्धतेनुसार ठराविक वनपरिक्षेत्रांतर्गत खड्डेदेखील खोदून ठेवण्यात आले आहे; मात्र पावसाचे आगमन होत नसल्याने वृक्षारोपणाला तूर्तास ‘ब्रेक’ लागला आहे. सामाजिक वनीकरणाकडून २ लाख १० हजार रोपांच्या लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच वनविकास महामंडळाकडून जिल्ह्यात ३ लाख ९३ हजार ७५० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. मात्र पावसाच्या उघडीपीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यात निम्म्यावर वृक्षारोपण थांबले असल्याचे वनक्षेत्रपाल प्रवीण डमाळे यांनी सांगितले.
वनविभागाकडे मुबलक रोपे उपलब्ध असून, ज्या तालुक्यांत लागवड करावयाची आहे, त्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून रोपांच्या संख्येनुसार वनजमिनीवर खड्डे खोदण्याचेही काम पुर्ण करण्यात आल्याचा प्रशासनाने दावा केला आहे.
---इन्फो---
इगतपुरी, पेठमध्ये वृक्षारोपण
पावसाने इगतपुरी, पेठ या तालुक्यांमध्ये चांगली हजेरी लावल्याने या भागात वृक्षारोपणाला सुरुवात झाली आहे. नाशिक पश्चिम वनविभागाच्या इगतपुरी वनपरिक्षेत्रात वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांनी दिली. सिन्नर तालुक्यात पावसाची उघडीप असल्याने अद्याप येथे सुरुवात करण्यात आलेली नाही. या तालुक्यात ८२ हजार ५०० रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असल्याचे पवार यांनी सांगितले. पेठ तालुक्यात वृक्षारोपणाला सुरुवात झाली आहे.
050721\583905nsk_8_05072021_13.jpg~050721\583905nsk_9_05072021_13.jpg
वृक्षारोपणाला खोळंबा~वृक्षारोपणाला खोळंबा