नाशिक : नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरलेल्या अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका येथील स्मार्ट रोडचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, स्वत: आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीच त्याचा अनुभव मंगळवारी (दि.२५) घेतला. दिवसभरात दोन ते अडीच तास कामच सुरू असते त्याचप्रमाणे या कामामुळे रस्त्यालगतच्या दुकानदारांचे व्यवसाय ठप्प झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. त्यामुळे आयुक्तांनी नागरिकांची या त्रस्तेतून सुटका करण्यासाठी सध्या ज्या बाजूचे काम सुरू आहे ती बाजू ३१ जानेवारीपर्यंत खुली करण्याचे महत्त्वाचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. दुसऱ्या बाजूचे काम पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत डेडलाइन आहे हे कामही वेळेत पूर्ण करण्याची मुदत आयुक्तांनी दिले आहे. दरम्यान, स्मार्ट सिटींच्या नियंत्रणाबाहेर गेलेला या रस्त्याचे कामकाज ३१ मार्चपर्यंत पूर्ण होणे जवळपास अशक्य असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, महाकवी कालिदास कलामंदिर तसेच महात्मा फुले यात त्रुटी असल्याने त्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच या कामाच्या निविदा देखभालीच्या कामाची निविदा लवकर काढण्यात येणार असल्याचे स्मार्ट सिटीच्या सूत्रांनी सांगितले.स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकपदी नुकतीच महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची निवड झाली असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोमवारी (दि.२४) स्मार्ट सिटीच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मंगळवारी (दि.२५) या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केली. अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यान १७ कोटी रुपये खर्च करून स्मार्टरोड तयार करण्यात येत आहे या कामाची आयुक्तांनी पाहणी केली. त्याचवेळी परिसरातील नागरिकांनी या स्मार्टरोडमुळे व्यवसाय ठप्प झाल्याच्या तसेच काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी केल्या. रस्त्याचे काम दिवसभरात अवघे दोन ते अडीच तासच चालते नंतर ठेकेदार किंवा मजूर कोणीही फिरकत नाही अशा तक्रारीदेखील करण्यात आल्या. या रस्त्यामुळे विजेच्या तसेच टेलिफोनच्या केबल तुटतात, परंतु त्या दुरुस्त करायलादेखील कोणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या याठिकाणी केबलसाठी डक्ट खोदण्यात आल्या आहेत, परंतु केबल टाकल्या नसल्याबद्दल आयुक्त गमे यांनी ठेकेदाराला जाब विचारला तसेच ३१ जानेवारीच्या मुदतीत एकाबाजूचे काम पूर्ण करून अशोकस्तंभाकडून त्र्यंबक नाका येथील पेट्रोलपर्यंतचा मार्ग खुला करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, ठेकेदार तेथेच हतबलता व्यक्त केली असल्याने हे काम पूर्ण होण्याविषयी शंका आहे.आयुक्त गमे यांनी या स्मार्ट रोडबरोबरच महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन, नूतनीकरण झालेले नेहरू उद्याान, स्मार्ट वाहनतळ यासह अन्य कामांची पाहणी केली. कामे वेळेत पूर्ण होण्याबाबत तसेच संचालकांनी केल्या मागण्यांबाबत काही अडचणी दिसून आल्या. त्यामुळे सर्व संचालकांशी चर्चा करून त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.आयुक्तांची पाठ फिरताच काम बंद..स्मार्टरोडचे काम ज्या ठेकेदाराकडे आहे त्याचे कर्मचारी दिवसभरात अवघे दोन ते अडीच तासच काम करतात नंतर निघून जातात. अशी तक्रार परिसरातील नागरिकांनी आयुक्तांकडे केली. परंतु आयुक्त गमे यांची पाठ फिरताच रस्त्याचे काम करणारे ठेकेदाराचे कामगार निघून गेले. अशीच अवस्था असल्यास वेळेत रस्त्याचे काम पूर्णच होऊ शकणार नाही, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले आणि स्मार्ट सिटीच्या कामाविषयी संताप व्यक्त केला. या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा उडला असून, या मार्गावरील शाळा, रुग्णालये, रहिवासी आणि व्यावसायिक आस्थापनांमधील नागरिकांचे काम ठप्प झाले आहे.कलादालनाच्या ठेकेदाराचे देयक अदा...महात्मा फुले कलादालनात अनेक प्रकारच्या त्रुटी असून, त्यास वास्तुविशारदांनीच आक्षेप घेतला आहे. त्यामुळे ठेकेदाराला बिल देत नाही बदल्यात ठेकेदार कलादालनाच्या चाव्याच देत नाहीत, असा आरोप स्मार्ट सिटीचे संचालक शाहू खैरे यांनी केला होता. मात्र, दरम्यान सोमवारी (दि.१४) आयुक्त गमे यांनी आढावा घेतानाच त्यास बिल देण्यास मंजुरी दिली असल्याचे खैरे यांचे म्हणणे असून, त्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आयुक्तांनी किमान मंगळवारी (दि.२५) पहाणी दौरा केल्यानंतर बिल देणे उचित नव्हते, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, कलादालन पालिकेच्या ताब्यात असून, यापूर्वी काही कार्यक्र म तिथे झाल्याचा दावा महापालिकेच्या प्रशासनाने केला आहे. कलादालनाच्या देखभालीसाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने देखभालीची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविली गेली. त्यापोटी कोणताही खर्च करावा लागला नाही. त्यातच नियमानुसार कला दालनाच्या कामांची तीन वर्षांची जबाबदारी कंत्राटदारावर आहे. कलादालनाच्या दैनंदिन देखभालीच्या कामाची लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘स्मार्ट सिटी’चा संथ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:49 AM