पेठ : येथील सावळघाटात राज्य परिवहन महामंडळाच्या त्र्यंबकेश्वर-नाशिक-पेठ या बसचे चाक निखळले; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.नाशिक येथून पेठकडे येणारी पहिली बस म्हणून या बसने अनेक व्यापारी, चाकरमाने, विद्यार्थी येत असतात. बुधवारी सकाळी बस (क्र. एमएच २० बीएल ४२४८) सावळघाटात उताराला लागली असता अचानक बसचे डाव्या बाजूचे पुढचे चाकच निखळले. चालकाने प्रसंगावधान राखून बसच्या गतीवर ताबा मिळवला. मात्र निखळलेले चाक थेट दरीत गेले. बसमध्ये प्रवास करणाºया प्रवाशांनी एकच आरडाओरड केला. दाट झुडपात चाक गेल्याने दोन तासाच्या प्रयत्नांनी चाकाचा शोध लागला. घाट रस्ता व तीव्र उताराच्या ठिकाणी हा अपघात घडल्याने प्रवासी बालंबाल बचावले.