मालेगाव : कापड व्यवसायावर मंदीचे सावट पसरले असून याचा परिणाम शहरातील यंत्रमाग व्यवसायावर झाला आहे. कापड उत्पादनाला उठाव नसल्याने शहरात १ हजार कोटी मीटर कापड पडून आहे. तर १ लाख मजुरांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.शहरातील अडीच लाख यंत्रमागाचा खडखडाट गुरुवारपासून पुढील पाच दिवस बंद राहणार आहे. परिणामी लाखो रुपयांची उलाढाल थंडावली आहे. राज्यभरातील १५ लाख यंत्रमागांपैकी अडीच लाख यंत्रमाग मालेगाव शहरात आहेत. या व्यवसायाला असलेले पूरक व्यवसायही मोठ्या प्रमाणात मालेगावात सुरू झाले आहे. शहरात तयार होणारा कच्चामाल पाली, बालोत्रा येथे प्रक्रियेसाठी पाठविला जातो. बाजारपेठेत कापडाला १२ रुपये ५० पैसे मीटर प्रमाणे मागणी होती मात्र मंदीच्या संकटाने ११ रुपये ३० पैसे दराने व्यापारी खरेदीसाठी तयारी दर्शवित आहेत. मीटरमागे १ रुपयांचे नुकसान होत असल्याने यंत्रमाग कारखानदार अडचणीत सापडले आहेत. निर्मिती व पुरवठ्यामध्ये ताळमेळ बसत नसल्याने व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. एका यंत्रमागावर ८० मीटर कापड तयार होतो. शहरातील यंत्रमाग कारखान्यांचा विचार करता दर दिवसाला ३ कोटी मीटर कापडाची निर्मिती होते. यंत्रमाग कारखाना बंद असल्यामुळे शहरातील मजुरांचा रोजगार बुडाला आहे. पाच दिवस यंत्रमाग बंद राहणार असल्यामुळे लाखो रुपयांची होणारी उलाढाल मंदावली आहे.
मंदीमुळे यंत्रमागाचा खडखडाट थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 1:15 PM