नाशिक - शहराची ओळख असलेल्या गोदावरी नदीच्या दोन्ही काठांवर सौंदर्याचा साज चढविणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोदा प्रकल्पाच्या सुमारे ३५० कोटी रुपयांच्या मास्टर प्लॅनला गुरुवारी (दि.२) नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ‘गोदा प्रकल्प’ अंतर्गत दोन टप्प्यांत १८ कामे साकारली जाणार असून नववर्षात प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष व ज्येष्ठ सनदी अधिकारी सीताराम कुंटे यांनी दिली.स्मार्ट सिटी अंतर्गत कंपनीची पाचवी बैठक महापालिकेच्या मुख्यालयात सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मूळ ५१५ कोटी रुपयांचा असलेल्या गोदा प्रकल्पाचा मास्टर प्लॅन सादर करण्यात आला. त्यातील १८ कामांना संचालक मंडळाने मंजुरी दिली. त्यामध्ये प्रामुख्याने, अॅम्पी थिएटर, सायकल ट्रॅक, प्राचीन कुंड पुनर्जिवित करणे, पुलांची निर्मिती आदी कामांचा समावेश आहे. पुनर्विकास अर्थात रेट्रोफिटींग आणि ग्रीनफिल्ड अर्थात हरितक्षेत्र या अंतर्गत दोन टप्प्यांमध्ये सदर कामे केली जाणार आहेत. सुरुवातीला रेट्रोफिटींग अंतर्गत कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याच्या सूचना कुंटे यांनी दिल्या. बैठकीत, सोलर रुफटॉफ प्रकल्पाच्या डीपीआरलाही मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांतर्गत शहरातील सहा ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहेत. त्यात महापालिकेचे पंचवटी विभागीय कार्यालय, मनपाचे इंदिरा गांधी हॉस्पिटल आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, महात्मा फुले कलादालन, कालिदास कलामंदिर आणि पंचवटीतील मनपाची ज्ञानेश्वर अभ्यासिका यांचा समावेश आहे. सुमारे ३७ हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रात सौर ऊर्जेचा वापर होणार असून या प्रकल्पासाठी १ कोटी ६३ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या १.१ कि.मी. दरम्यान स्मार्ट रोड साकारण्यात येणार असून त्याच्याही सविस्तर प्राकलनाला मंजुरी देण्यात आली. नाशिक अमरधाममध्ये इलेक्ट्रिक विद्युत दाहिनी बसविण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार, सर्वात कमी दराच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. या दाहिनीसाठी २ कोटी ३२ लाख ९८ हजार रुपये खर्च येणार आहे. याशिवाय, कंपनीचे स्वत:चे पोर्टल व अॅप विकसित करण्यात येणार असून त्यालाही मान्यता देण्यात आली. बैठकीला, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारे, भारत सरकारच्या उपसचिव रेणू सतिजा, संचालक महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आदी उपस्थित होते.४१ ठिकाणी स्मार्ट पार्कींगशहरात स्मार्ट सिटी अंतर्गत ४१ ठिकाणी स्मार्ट पार्कींग मॅनेजमेंट सिस्टम राबविण्याच्या सविस्तर प्राकलनाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये ३४ ठिकाणी आॅन स्ट्रीट तर ७ ठिकाणी आॅफ स्ट्रीट पार्कींग विकसित करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पालाही तातडीने चालना देण्याच्या सूचना सीताराम कुंटे यांनी दिल्या. याचबरोबर स्मार्ट सिटीचे कार्यालय महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयात स्थलांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली. ३५० स्क्वेअर मीटरमध्ये सदर कार्यालय थाटण्याचे काम सुरु आहे.
नाशिकची ओळख असलेल्या गोदावरीचा नदीकाठ होणार ‘स्मार्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 4:05 PM
स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत ३५० कोटींच्या गोदा प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी
ठळक मुद्दे‘गोदा प्रकल्प’ अंतर्गत दोन टप्प्यांत १८ कामे साकारली जाणारसुरुवातीला रेट्रोफिटींग अंतर्गत कामे हाती घेतली जाणार