नाशिक : शहर स्मार्ट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी कंपनीला गळती लागली असून, सध्या कंपनीचे नऊ संचालक असताना कर्मचाºयांची संख्या घटून ती अवघ्या सहा वर आली आहे. त्यातही चार कर्मचारी शासकीय असल्याने प्रत्यक्षात दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे शहर स्मार्ट कसे होणार? असा प्रश्न याच कंपनीचे संचालक असलेल्या शाहू खैरे यांनी केला आहे.नाशिक शहराची स्मार्ट सिटी अंतर्गत निवड झाली असून, या कंपनीत एकूण ११ पदे मंजूर आहेत. परंतु वेळोवेळी भरलेली ही पदे मात्र आता रिक्त होत असून, त्यामुळेच कंपनीचे कामकाज चालणार की बारगळणार? असा प्रश्नदेखील उपस्थित आहे. स्मार्ट कंपनीची सध्या कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. मात्र त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्गच उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. कंपनीचे सीएओ असलेले प्रमोद रघुनाथ गुजर हे ३ जुलै २०१७ रोजी रुजू झाले आणि ३१ मार्च २०१८ रोजी राजीनामा देऊन निघून गेले.विशेष म्हणजे कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे, पदसिद्ध मनपा आयुक्त तसेच संचालक म्हणून महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृहनेता दिनकर पाटील, शाहू खैरे, गुरुमित बग्गा, स्वतंत्र संचालक भास्कर मुंढे, तुषार पगार यांचा विचार केला, तर संचालकांची संख्या ही कर्मचाºयांपेक्षा जास्त आहे. सध्या स्मार्ट सिटीत अवघे सहा कर्मचारी शिल्लक आहेत.
स्मार्ट सिटी कंपनी : कर्मचाऱ्यांपेक्षा संचालक जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 1:15 AM