नाशिक : स्मार्ट सिटी अभियानात समावेश झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पाेरेशन या कंपनीत उच्चपदस्थ अधिकाºयांची भरती झाली परंतु, कार्यालयीन कामकाजासाठी लागणारा पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याने कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. कंपनीच्या प्रशस्त कार्यालयासाठी महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील वरच्या मजल्यावरील जागा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी कंपनीचा कारभार अजूनही राजीव गांधी भवनमधूनच चालविला जात आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये केंद्र सरकारकडून दुसºया टप्प्यात नाशिकचा स्मार्ट सिटी अभियानात समावेश करण्यात आला. त्यानंतर, नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना करण्यात येऊन ज्येष्ठ सनदी अधिकारी सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ नियुक्त झाले. त्यानंतर, कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी प्रकाश थवील यांची तर मुख्य लेखाधिकारी म्हणून बाबूराव निर्मळ, माहिती व तंत्रज्ञान विभागप्रमुख म्हणून प्रवीण गुर्जर आणि कंपनी सचिवपदी महेंद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच नगररचना नियोजनकारचा कार्यभार सिडकोच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी कांचन बोधले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मुख्य अभियंता आणि जनसंपर्क अधिकारी ही पदे अद्याप भरण्यात आलेली नाहीत. याशिवाय, कंपनी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्था म्हणून केपीएमजीकडे कार्यभार बहाल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत कंपनीचे कामकाज महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथूनच चालविले जात असून, मुख्य कार्यकारी अधिकारी थवील यांना निवृत्त उपआयुक्त दत्तात्रेय गोतीसे यांची रिक्त झालेली कॅबिन देण्यात आलेली आहे, तर अन्य अधिकारी भुगयोच्या कार्यालयातून कामकाज चालवितात. कंपनीच्या कार्यालयासाठी पंचवटी विभागीय कार्यालयातील वरच्या मजल्यावरील जागा देण्यात आली आहे. सध्या या कार्यालयातील फर्निचरचे काम सुरू असून, कार्यालयाला कार्पोरेट लूक देण्याचा प्रयत्न आहे. कंपनीच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवातही झालेली असून, कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालनासह नेहरू उद्यानाच्या पुनर्विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. डिसेंबर महिन्याअखेर स्मार्ट रोड, स्मार्ट पार्किंगसह प्रोजेक्ट गोदाच्या कामांच्या निविदाप्रक्रिया राबविल्या जाणार आहेत. त्यामुळे कामकाजाला गती येणार आहे. मात्र, सद्यस्थितीत केवळ उच्चपदस्थच अधिकारी नियुक्त झाले आहेत. त्यांना कामकाजासाठी लागणारा अत्यावश्यक कर्मचारीवर्ग अद्याप भरती करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाºयांपासून ते नगर नियोजनकारापर्यंतच्या अधिकाºयांना साधा शिपाईही उपलब्ध होऊ शकलेला नाही. दरम्यान, प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल त्यानंतर आवश्यकतेनुसार कर्मचारी भरती केली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी थवील यांनी दिली आहे.
‘स्मार्ट सिटी’ कंपनीचा पांगुळगाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:18 AM