नाशिक : ठेकेदारांशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने अनेक शहरांतील नगरसेवक ‘स्मार्ट सिटी’तील योजनांना विरोध करीत आहेत. या योजनांमुळे आपल्या अधिकारांवर गदा येत असल्याच्या त्यांच्या म्हणण्यात तथ्य नाही. निव्वळ टेंडरवर हक्क सांगणाऱ्या नगरसेवकांनी आपल्या जबाबदाऱ्या निभावल्या असत्या तर ही वेळच आली नसती, अशा शब्दांत नागरीकरण तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनी राजकारण्यांना फटकारले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘मुक्तायन’ उपक्रमात ‘स्मार्ट सिटी’ या सध्या गाजत असलेल्या विषयावर महाजन यांचे व्याख्यान व सादरीकरण झाले. त्यांनी ‘स्मार्ट सिटी’ ही संकल्पना, तिची वैशिष्ट्ये, तिच्यापुढची आव्हाने या बाबी अभ्यासपूर्ण रीतीने उलगडून दाखवल्या. त्या म्हणाल्या, परदेशात १९६० पासून शहरांचा अभ्यास सुरू झाला. आपल्याकडे अजूनही तो होत नाही. येत्या २०५० पर्यंत ७५ टक्के जग नागरी होईल; मात्र या शहरीकरणात फक्त भौतिक विकास अपेक्षित नाही, तर नागरिकांची मानसिकताही महत्त्वाची आहे. अमेरिकेत शहरे मैलोन्मैल पसरलेली आहेत, तर दुबईत मात्र फक्त इमारती, विमानांची गर्दी आहे. या सगळ्यात माणूस बेदखल आहे. स्मार्ट सिटी संकल्पनेत स्मार्ट प्रशासन, पाणी, वाहतूक, तंत्रज्ञान, ऊर्जा, इमारती, आरोग्यसेवा, नागरिक यांचा अंतर्भाव असला, तरी त्यात प्रशासन व नागरिक हे सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. या पार्श्वभूमीवर आरामदायी शहरे निर्माण करण्याचे आव्हान उभे असल्याचे त्या म्हणाल्या. २००८-०९ मध्ये स्मार्ट फोनद्वारे एकाच उपकरणातून अनेक गोष्टी साध्य करता येऊ लागल्यानंतर हे तंत्रज्ञान शहर नियोजनासाठी वापरता येईल का, याचा विचार सुरू झाला. भारताने शंभर ‘स्मार्ट’ शहरे निर्माण करण्याची घोषणा केल्यानंतर ‘युनो’ने एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ‘स्मार्ट सिटी’चे निकष ठरवण्यात आले. मानवी भावभावनांमुळे घडणाऱ्या चुका शहराच्या यंत्रणेवर विपरीत परिणाम करतात. स्मार्ट सिटीमध्ये अशा चुकांवर मात करता येते. अपघात कोणाकडूनही घडलेला असला, तरी त्याची आपोआप नोंद होते. ही यंत्रणा न्यायव्यवस्थेशी संलग्न असते. सांडपाणी ओव्हरफ्लो होणार असेल वा ट्रान्सफॉर्मर बदलण्याची वेळ आली असेल, तरी यंत्रणा सूचना देते. सार्वजनिक आरोग्यात प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना करता येतात, असेही त्यांनी सांगितले. महाजन यांनी नागरिकांच्या शंकाचे निरसनही केले. डॉ. श्याम अष्टेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
राजकारण्यांमुळे ‘स्मार्ट सिटी’ला फटका
By admin | Published: February 28, 2016 11:13 PM