नाशिक : स्काडा मीटरच्या निविदेत घोळ, संचालकांना अंधारात ठेवणे आणि अन्य तक्रारींमुळे गेल्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची बदली झाल्याशिवाय बैठकीस उपस्थित न राहण्याचा इशारा नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या महापालिकेतील पदाधिकारी संचालकांनी दिला होता. त्यानुसार ही बैठक रद्दही झाली, परंतु आता थविल हे कायम असतानाच पुन्हा कंपनीची बैठक गुरुवारी (दि.१८) होत असून, त्यामुळे आता महापौर आणि अन्य पदाधिकारी संचालक काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचा कारभार अगोदरच वादग्रस्त असून, त्यात अनेक वादांची भर पडली आहे. मध्यंतरी जलमापनासाठी संपूर्ण शहरासाठी स्काडा मीटर बसविण्याच्या निविदेतील परस्पर बदलांमुळे मोठा घोटाळा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावरून संचालकांनी आरोप केले, परंतु हेच निमित्त करून स्मार्ट सिटी कंपनीचा रखडलेला रस्ता आणि त्यातील आयटम कमी होऊनही वाढीव चार कोटी रुपयांची रक्कम देण्याचा घातलेला घाट, फुले कलादालनाचे सदोष काम असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते, परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा येथील कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या वागणुकीसंदर्भात होता. थविल यांच्या बोलण्याची पद्धत, संचालकांना माहिती न देणे आणि अन्य अनेक आरोप त्यांच्यावर होते. संचालकांना माहिती न देताच परस्पर ते कार्यक्रम ठरवितात तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करतात, असा आक्षेप होता. दर तीन महिन्यांनी स्मार्ट सिटी कंपनीची बैठक होणे बंधनकारक आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या बैठकीच्या दिवशी सर्व संचालकांनी संताप व्यक्त केला होता. बैठक सुरू होण्याच्या आतच कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांची कंपनीचे संचालक असलेल्या महापौर रंजना भानसी, दिनकर पाटील, शाहू खैरे, गुरुमित बग्गा अशा सर्व संचालकांनी भेट घेऊन जोपर्यंत थविल यांची बदली होत नाही तोपर्यंत बैठकीस हजर राहणार नाही, असे निक्षून सांगितल्याने कुंटे यांनी बैठक रद्द केली होती. इतकेच नव्हे तर थविल यांच्या ऐवजी अन्य अधिकारी शोधावा लागेल, असेही सांगितले होते.इलेक्ट्रिक सायकलींचे ऐनवेळी उद्घाटनसायकल शेअरिंगमध्ये आता इलेक्ट्रिकल सायकलींची भर पडली असून, त्याचे उद्घाटन गुरुवारी (दि.१८) दुपारी म्हणजे बैठकीच्या ऐनवेळी राजीव गांधी भवनातील सायकल डॉकवर होणार आहे. तथापि, अनेक संचालकांना बुधवारी (दि.१७) पत्र मिळाल्यानंतरच हा प्रकार कळला. त्यामुळे त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
मूळ प्रश्न ‘जैसे थे’ ठेवूनच आज स्मार्ट सिटीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:54 AM