नाशिक शहरात स्मार्ट सिटी विरुद्ध महापालिका असा संघर्ष सुरू आहे. गेल्या पाच वर्षात कंपनीचे प्रत्येक काम काही ना काही कारणाने वादग्रस्त ठरत आहे. त्यातच कामाची संथगती असल्याने सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी पडून असल्याचे महापालिका पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील विकास कामे करण्याची घाई आहे. त्यातच कोरोनामुळे आर्थिक टंचाई असल्याने महापालिकेने आता स्मार्ट सिटी कंपनीला विकास कामांसाठी दिलेले १०० कोटी रुपये परत घेण्याचे ठरवले. तसा ठरावदेखील करण्यात आला. मात्र, त्यावर थवील यांनी केलेल्या विधानामुळे गेल्या मंगळवारी (दि. २९) स्मार्ट सिटीचे कामकाज या विषयावर महासभा घेऊन जेारदार टीका करण्यात आली होती.
दरम्यान, यापूर्वी महासभेने शंभर कोटी रुपये परत घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कंपनीची सभा झाली; परंतु त्या सभेत महापौर सतीश कुलकर्णी गैरहजर होते. त्यामुळे २ जुलै रोजी सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष बैठक घेण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजता स्मार्ट सिटी कंपनीच्या सभागृहात बैठक होणार आहे.
इन्फो...
बैठकीतील प्रमुख विषय
या बैठकीत स्मार्ट सिटीकडून निधी परत घेण्याबराेबरच मखमलाबाद येथील प्रकल्पाची माहिती देणे, स्मार्ट पार्किंगच्या ठेकेदाराने मागितलेली सवलत, गावठाण विकास प्रकल्पांतर्गत २० रस्त्यांचा समावेश करणे अशा अन्य कामांचा समावेश आहे.
इन्फो...
थवील यांची कुंटे यांच्याकडे शिष्टाई
नाशिक महापालिकेच्या महासभेत स्थायी समितीच्या बैठकीत प्रचंड टीकेचे धनी ठरलेले कंपनीचे सीईओ प्रकाश थवील यांनी बुधवारी (दि. ३०) मुंबईत धाव घेऊन कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांची भेट घेतली हेाती. त्यांच्या समवेत कंपनीचे अन्य तीन अधिकारीदेखील होते. त्यांनी महासभेतील आरोप-प्रत्यारोपाच्या संदर्भात सफाई दिल्याचे समजते. थवील यांना पाठीशी घालत असल्याचे थेट आरोप कुंटे यांच्यावरच झालेला असल्याने ते आता प्रत्यक्ष बैठकीत काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.