नाशिक : एन. डी. पटेल रोडवर खोदलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी प्रचंड गरम असलेली डांबरी कच घेऊन मंगळवारी (दि. ८) स्मार्टसिटीअंतर्गत सेवा देणारा ट्रक या ठिकाणी आला. खोदलेला रस्ता व्यवस्थित न बुजविल्याने ट्रकचे चाक त्यामध्ये खोलवर रुतले आणि ट्रक उलटून दुर्घटना घडली. येथे असलेल्या २१ वर्षीय मजुराच्या अंगावर गरम डांबरी कच पडल्याने तो गंभीररित्या भाजला.
टपाल कार्यालयाकडून एसटीच्या आगाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास डांबरी बारीक कच टाकून खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण स्मार्टसिटीकडून करण्यात येणार होते. यासाठी डांबरी कचने भरलेला ट्रक (एमएच १२ क्यु.जी १२१३) पूर्णत: उलटला. काही दिवसांपूर्वी स्मार्टसिटीअंतर्गत विकासकामासाठी रस्ता एका बाजूने खोदण्यात आला होता. खोदलेला रस्ता थातुरमातुर पद्धतीने बुजविण्यात आला. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी डांबरी कच घेऊन आलेल्या ट्रकचे पाठीमागील चाक खड्ड्यात रुतले आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर चालकबाजूने रस्त्यावर कोसळला. यावेळी डांबरी कच खाली पडल्याने त्याखाली कामगार नारदसिंग बनवासी (वय २१, मूळ रा. मध्यप्रदेश) दाबला गेला. यावेळी तेथे असलेल्या महिला मजुरांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी धाव घेतली. यावेळी खडी पसरविण्याच्या फावड्यांनी डांबरी कच बाजूला करत ढिगाऱ्यात अडकलेल्या नारदसिंगला बाहेर काढण्यात यश आले. कच खूप गरम असल्याने तो भाजला गेला. त्याच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली. तात्काळ परिसरातील नागरिकांनी त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेनंतर रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.
---इन्फो--
स्मार्टसिटीच्या खोदकामामुळे नाशिककर वेठीस
स्मार्टसिटीने शहरभर खोदलेल्या रस्त्यांमुळे ठिकठिकाणी लहान-मोठे अपघात घडत आहेत. तसेच नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खोदकाम करताना कुठल्याहीप्रकारे प्रभावीपणे खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे बोलले जात आहे. पोलीस आयुक्तालयाच्या शहर वाहतूक शाखेकडून यापूर्वीच प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेत खोदकामाच्या ठिकाणी अपघात घडल्यास त्यास संबंधित स्मार्टसिटी कंपनी जबाबदार राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.