महाराष्ट्र उद्योगासाठी प्रथम पसंतीचे शहर मानले जाते. कोरोना काळातही राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली असून देशातील २४ उद्योग समूहांनी महाराष्ट्रात हजारो कोटी रुपयांची गुंतवणुकीसाठी करार केले आहेत. यात कोकणात ४७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून अन्य ठिकाणी गुंतवणूक करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात अगदी भुसावळ आणि नरडाण्याला अनेक उद्योग सुरू करण्यासाठी करार झाले आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्यात एकही नवीन उद्योग येण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाल्याने उद्येाग क्षेत्राला धक्का बसला आहे.
मुंबई- पुणे या सुवर्ण त्रिकोणात नाशिक जिल्हा असून सातपूर, अंबड ही मोठी औद्योगिक वसाहत आहे. सिन्नरला तर उद्योगांबरोबरच सेझ देखील आहे. तसेच वाईन पार्क आणि फूड पार्क बरोबरच मालेगाव तर टेक्स्टाईल पार्क देखील आहे. नाशिक शहरात उद्योग क्षेत्रासाठी जागा नसली तरी दिंडोरी तालुक्यात आक्राळे येथे नवीन औद्याेगिक वसाहत तयार होऊन पडली आहे. याशिवाय आग्रारोडवर इगतपुरी, गोंदे, वाडीवऱ्हे अशा अनेक ठिकाणी उद्याेग सुरू आहेत. नाशिकला दळणवळणाची साधने तर आहेतच परंतु विमान सेवाही सध्या फार्मात आहे. अशा सर्व प्रकारच्या पोषक वातावरणानंतर देखील मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये एकही प्रकल्प येण्यास तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिकमध्ये मोठ्या उद्योगांवर आधारित लहान व्हेंडर्स मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना नवीन उद्योगाची आस आहे. विशेषत: कोरोना काळात अर्थकारण डळमळीत झाल्याने नवीन उद्येागांची अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र निराशा पदरी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोट..
केवळ कोट्यवधी रुपयांचे करार करून उपयोग नाही. ते उद्योग आले पाहिजेत. एकूणच उद्योगांकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी मेक इन नाशिक उपक्रम मुंबईत राबवण्यात आला, परंतु त्यावेळी ज्यांनी स्वारस्य दाखवले, त्यांना देखील नाशिकमध्ये जागा मिळाली नाही, मग उद्योग कसे येणार? नाशिकमध्ये लघु उद्याेग मोठ्या प्रमाणात असून त्यांना कोराेना काळातील अडचणीनंतर दिलासाही मिळालेला नाही.
- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स ॲँड इंडस्ट्री
इन्फो...
मेक इन काहीच नाही...
मेक इन महाराष्ट्र आणि त्यानंतर मेक इन नाशिक हा मुंबईत निमाच्या पुढाकाराने राबवलेल्या उपक्रमात देखील आता खूप गुंतवणूक येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. इंजिनिअरिंग क्लस्टर, इलेक्ट्रिक क्लस्टर, डिफेन्स इनोव्हेशन हब असे शब्द कागदावरच राहिले आहेत.