नाशिक : स्मार्ट सिटीसंदर्भात महापालिकेला येत्या ३ डिसेंबरपूर्वी राज्य सरकारकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावयाचा आहे. या पार्श्वभूमीवर आज आयुक्तांनी स्मार्ट सिटी प्रस्ताव सादरीकरणाची जाहीर बैठक बोलाविली होती. या बैठकीत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत सूचनांचा वर्षाव केला. दरम्यान, आयुक्तांनी स्मार्ट सिटीचा आराखडा नागरिकांपुढे सादर क रत विश्लेषण केले.प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी विशेष कार्यक्रम गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध लोकप्रतिनिधींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या स्मार्ट शहराच्या प्रस्तावाचे दृक माध्यमातून उपस्थितांपुढे सादरीकरण केले. गेडाम विरुद्ध फरांदे
आयुक्तांचे सादरीकरण समाप्त झाल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांनी सभागृहात हातात माईक घेऊन पहिला प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे शहर स्मार्ट होईल का? स्मार्ट शहराच्या कल्पनांच्या तुलनेत स्मार्ट सोल्यूशन फार कमी मांडल्याचा आरोप फरांदे यांनी यावेळी गेडाम यांच्यावर केला. त्यानंतर गेडाम यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत वेळेअभावी सर्व ‘सोल्यूशन’चा आढावा घेतला नाही; मात्र सर्वच बाबी अंतर्भूत करण्यात आल्याचे सांगितले.