मनोज मालपाणी
सध्या आनलाइन पद्धतीने फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत. सोशल मीडियावर बनावट अकाउण्ट बनवून गैरवापर करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आयुक्तालयाच्या सायबर सेल विभागाकडे दररोज १५-२० आॅनलाइन फसवणूक, फेक अकाउण्ट, सोशल मीडियाचा गैरवापर आदी प्रकारच्या तक्रारी दाखल होतात. यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र सायबर सेल विभाग निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिकरोड - उपनगर - देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याची एकूण हद्द जवळपास ९२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असून, जवळपास ८.५० लाख लोकसंख्या आहे. आगामी दहा वर्षात अंदाजे ३ ते ४ लाखाने लोकसंख्या वाढण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मिती सोबत पोलीस ठाण्याची हद्द ठरविणे, प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर सेलची स्थापना करणे व पोलिसांना अभ्यासात्मक स्मार्ट बनविल्यास कायदा-सुव्यवस्था सांभाळणे शक्य होईल. आता पोलीस प्रशासन स्मार्ट बनविण्याची गरज निर्माण झाली आहे.परिसरातील पोलीस ठाण्यांचा विचार केल्यास नाशिकरोड पोलीस ठाणे मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. भौगोलिक विकास, वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन २०११ मध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्याचे विभाजन करून उपनगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. मात्र त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही. अपुरे संख्याबळ, नवीन गुन्हेगार, बाहेरगावहून येऊन गुन्हा करून पसार होणारे गुन्हेगार वरिष्ठांचा वाढता हस्तक्षेप यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.तीन पोलीस ठाण्याचे प्रस्तावनाशिकरोड पोलीस ठाण्याकडून शिंदेगाव, उपनगर पोलीस ठाण्याकडून विहीतगाव व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याकडून भगूर असे तीन नवीन पोलीस ठाण्याचे प्रस्ताव यापूर्वीच पाठविण्यात आले आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५० गुन्ह्यांपेक्षा जास्त गुन्ह्यांचे प्रमाण असेल त्या पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करावी, असे गृहमंत्राल्याचे निर्देश आहेत. शिंदेगाव, विहितगाव, भगूर अशी नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करताना पहिले नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याची हद्द रद्द करावी. तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकसंख्या घनता, गुन्ह्याचे प्रमाण, सार्वजनिक, सामाजिक वातावरण, भौगोलिक रचना व भविष्यात विकसित होणारा परिसर यांचा सारासार विचार करूनच पोलीस ठाण्यांची निर्मितीत केली पाहिजे. आगामी दहा वर्षात या परिसराची लोकसंख्या १२-१३ लाखांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. नाशिकरोड - नाशिक ही दोन वेगळी गावे महामार्गावरील छोट्या-मोठ्या उपनगरांत एकमेकाला जोडली आहेत. जेलरोड, नांदूर नाक्यापर्यंत विस्तार झाला आहे. तर नाशिकरोड - देवळाली कॅम्पदेखील एकमेकांना जोडले गेले आहेत. लॅम्परोड व देवळाली कॅम्प-भगूर रस्ता आगामी काळात प्रतिजेलरोडसारखा गजबजून जाणार आहे. तर चेहेडी नाक्याच्या पुढे विकासाला सुरुवात झाली आहे. विजयनगर, पांढुर्ली रस्ता वाढू लागला आहे. नाशिकरोड-देवळाली कॅम्प पंचक्रोशीतील ग्रामीण गावातदेखील टुमदार इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. मुख्य नाशिकरोडमध्ये जागा कमी असल्याने बांधकाम क्षेत्राचे लक्ष आता या भागाकडे वळाले आहे. त्यामुळे आगामी दहा वर्षात स्वतंत्र शहर परिसर होणार आहे. कायद्याचा व खाकीचा दरारा राखण्यासाठी नव्हेतर वृद्धिंगत करण्यासाठी स्मार्ट पोलीस प्रशासन निर्माण करणे गरजेचे आहे. पोलिस ठाण्यांतील सोयी सुविधा, आपली हद्द नाही असे म्हणून अंग झटकण्याची वृत्ती स्मार्ट पोलीस प्रशासनात कालबाह्य ठरावी.एखाद्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले तर पोलीस प्रशासन त्याकडे काणाडोळा करण्याची प्रवृत्ती चुकीची आहे. पूर्वी सायकल चोरीला गेली तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होत असे. मात्र कालांतराने सायकल चोरीचे प्रमाण वाढले अनेक वर्षांपासून सायकल चोरीचा गुन्हाच दाखल होत नाही. अशीच परिस्थिती सद्या मोबाइलची झाली आहे. आता मोबाइल चोरीला गेला तर पोलीस सरळ सरळ मिसिंग (हरविला) झाल्याची नोंद करून दाखला देतात. खूपच एखादा जण अडून बसला तर मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल होतो. यामुळे मात्र मोबाइल चोरट्याचे फावते आहे. समाज, राजकीय पक्ष, संघटना, कामगार आदींशी गोपनीय विभागाचे नेटवर्क होते.पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारकोड स्कॅनिंग लावण्यात आले आहे. बीट मार्शलच्या तीन पाळीत नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे दर दोन तासाला बीट मार्शलला त्या ठिकाणी यावेच लागत आहे. यामुळे चांगला परिणाम झाला आहे. निर्भया पथकामुळे रोडरोमिओ, प्रेमीयुगुल यांना दणका बसत आहे. पोलीस चौकी त्यांच्या हद्दीतील काम करेल. तेथूनच तात्काळ घटनास्थळी जातील अशी जी व्यवस्था करण्यात येत आहे, त्याकरिता चौकीचे पोलीस बळ वाढविण्याची गरज आहे. ग्रामीणच्या आउट पोस्ट पोलीस चौकीप्रमाणे संबंधित पोलीस चौकी त्यांच्या हद्दीतील कायदा-सुव्यवस्था, प्रशासकीय काम बघण्यास सुरुवात झाली आहे. संबंधित चौकीचा इन्चार्ज याला हे सर्व नियोजन करावे लागणार आहे. गुन्हा जरी पोलीस ठाण्यात दाखल होणार असला तरी त्यानंतरचे सर्व काम पोलीस चौकीतून होण्यास सुरुवात झाली आहे. ही पोलीस प्रशासनाची स्मार्ट पोलीस प्रशासनाकडे वाटचाल मानावी लागेल.