नाशिक : सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने दहीपूल, सराफबाजार, भांडीबाजारात प्रचंड पाणी भरले गेल्याने झालेल्या नुकसानीच्या आढाव्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी पाहणी दौरा केला. त्यावेळी सराफ बाजाराच्या समस्येवर स्मार्ट सिटी प्रोजेक्टमध्ये तोडगा काढण्यासह तज्ज्ञांच्या मदतीने सरस्वती नाल्यासह ड्रेनेजचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन उपस्थित व्यावसायिकांना दिले.दहीपूल परिसरातील सरस्वती नाला, फूलबाजार, सराफ बाजारातील नाले तुंबल्यामुळे सोमवारी सराफा बाजार, दहीपूल आणि संपूर्ण परिसराला पूराच्या पाण्याने वेढले होते. सोमवारी झालेल्या अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या. काही व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरले होते. मुसळधार पावसाने सराफा बाजारात कमरेएवढे पाणी साचून दरवर्षीप्रमाणे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुजबळ यांनी पूरपाण्याचा फटका बसलेल्या या परिसराचा पाहणी दौरा केला. यावेळी जमा झालेल्या कापड व्यावसायिक, सराफा दुकानदारांशी संवाद साधून नुकसानीचा अंदाज घेतला. त्यानंतर त्यांनी मनपा आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांशी बोलून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याचे तसेच पावसाळ्यात पुन्हा अशाप्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये, याबाबत काळजी घेण्याचे आदेशदेखील त्यांनी दिले.यावेळी माध्यमांशी बोलताना या भागातील नाल्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमताच पुरेशी नसल्याने ही समस्या सातत्याने निर्माण होत आली असल्याचे सांगितले. सरस्वती व इतर नाल्यांमुळे सराफ बाजार, फूलबाजार, कापड बाजारात नाले तुंबून पावसाचे पाणी बाजारात घुसते.-----------------कुरबुरी होतच असतात...सर्व प्रकारची दक्षता घेऊनही तीन मंत्र्यांना कोरोना झाल्याने राज्य शासनाच्या सर्व बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे मुख्यमंत्री आणि महत्त्वाची खाती असलेल्या मंत्र्यांमध्ये संपर्क कमी आहे.भेटीगाठी होत नसल्याने मतभिन्नता, कुरबुरी होणे साहजिक असते. खाट कुरकुरत असली तरी टिकाऊ आहे. एकाच पक्षाचे सरकार असले तरी वादविवाद होतात. इथे तर तीन पक्षांचे सरकार असल्यानेवाद-विवाद हे साहजिक आहेत, मात्र हे वाद फारसे मनावर न घेण्यासारखे असल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.ही समस्या दरवर्षीची असून, त्यावर स्मार्ट सिटीअंतर्गत तोडगा काढला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तज्ज्ञांच्या उपस्थितीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तज्ज्ञांच्या मदतीने ड्रेनेज तुंबण्याच्या समस्येवर मार्ग काढला जाईल, असे आश्वासनदेखील भुजबळ यांनी दिले.शिवभोजन थाळी प्रकरणात कुठेही गैरव्यवहार होत असेल तर त्याबाबत नक्कीच चौकशी केली जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले. यावेळी नाशिक सराफ संघटनेकडून यावेळी भुजबळांना निवेदन देण्यात आले.
पावसाळी समस्येवर काढणार ‘स्मार्ट’ तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:22 PM