नाशिक : ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणमधील १०० सराईत गुन्हेगारांच्या तडिपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच या गुन्हेगारांना हद्दपार केले जाणार आहे. दरम्यान, यामध्ये सुरगाणा येथील सराईत गुन्हेगार व शहरासह ग्रामीणमध्ये बारा गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या शामू नागू पवार (रा.दवाखानापाडा,सुरगाणा) यास दिड वर्षासाठी जिल्ह्यातून तडिपार करण्यात आल्याचे आदेश कळवणचे उपविभागीय अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी काढले आहेत.
ग्रामीण पोलीस हद्दीतील कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी सराईत गुन्हेगारांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे़ अधीक्षक दराडे यांच्या आदेशानुसार पोलीस ठाणेनिहाय सराईत गुन्हेगारांची यादी व तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़मालेगावचे अपर पोलीस अधिक्षक नीलोत्पल,विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १०० सराईत गुन्हेगारांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़ सद्यस्थितीत जिल्ह्यातून १९ सराईतांना तडीपार करण्यात आलेले असून त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे़
सुरगाणा येथील शामू पवार या सराईत गुन्हेगारावर ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये दंगल, हाणामारी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, खून, दरोडा, घरफोडी, चोरी, मटका, जुगार यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़ तर शहर पोलीस आयुक्तालयातील अंबडमध्ये दरोड्याची तयारी व पंचवटी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे़ विशेष म्हणजे सराईत पवारविरोधात तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने तसेच त्याची गुन्हेगारी व गुन्हेगारांना आश्रय दिल्याप्रकरणी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे़
सराईत पवारविरोधात सुरगाणा पोलिसांनी कळवण उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता़ त्यास उपविभागीय अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिड वषार्साठी जिल्ह्यातून तडीपार केले़