नांदगांव : मध्यरात्रीच्या अंधारात बेकायदा दारू वाहून नेणाऱ्या सफेद रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीला गस्त पोलिसांनी ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली आहे. गाडीत १०० लीटर गावठी दारूचे ड्रम बेमालूम लपविण्यात आले होते. याप्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एम. एच. ०६, बी.एम.०१८४ या क्रमाकांची स्कॉर्पिओ गाडीला रात्री नांदगाव येवला रस्त्यावर घाटात गस्त पोलिसांना संशय आल्याने गाडीला अडवून तपासणी केल्यावर प्लायवूडखाली दडवलेले २५ लीटर गावठी दारूचे चार ड्रम सापडले. राजकारण व समाजकारणातील एका उच्चपदस्थाच्या नावाचा बोर्ड गाडीला लावण्यात आला होता.
एकूण सहा लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परशराम किसन ठाकरे(४५) रा. धामणगाव ता.येवला याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांत दारूबंदीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. सुरेश सांगळे, पो.ह.दीपक मुंढे, अभिजात उगलमुगले पुढील तपास करीत आहेत.