इगतपुरी : अडचणीत सापडलेल्या माणसाच्या मदतीला अनेक जण धावतात. मात्र जखमी अजगराचे एका सर्पमित्राने प्राण वाचवल्याची दुर्मीळ घटना येथे घडली. इगतपूरी येथील तळेगाव शिवारात ही घटना घडली.हॉटेल अपना ढाबा जवळील जंगलात अजगर जखमी अवस्थेत आढळून आले. यावेळी तेथे एकच गर्दी झाली. एकाने सर्पमित्र राजेश सातारकर यांना ही माहिती सांगितली. सातारकर व त्याचे सहकारी सुदर्शन गोसावी सुनील शिंदे यांनी घटनास्थळी येऊन दहा फूट लांब जखमी अजगराला पकडत याबाबतची माहिती वनविभागाला कळवली. वनपरीक्षेत्र अधिकारी अहिरे यांच्या समवेत जाधव ,छत्रे, मुजीब शेख यांनी जखमी अजगराची पाहणी केली. यावेळी अजगराच्या पोटाला व पाठीला जखमांनी वेढले असल्याचे निदर्शनास आले. अजगराला इगतपुरी येथील पशु दवाखान्यात नेले असता तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. डॉ. संजय गायकवाड (वन्य प्राणी तज्ञ) व त्याच्या सहकाऱ्यांनी अजगरावर साडेचार तास शस्त्रक्रिया करत त्याचे प्राण वाचविले. अजगराला पंधरा ते वीस दिवसांनंतर जंगलात सोडणार आहे अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी संजय आहिरे यांनी दिली. (वार्ताहर)
सर्पमित्राने वाचविले अजगराचे प्राण
By admin | Published: October 31, 2014 10:37 PM