नाशिक : सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने शहरात घडतच आहे. मागील महिनाभरापासून या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. कॉलेजरोडवर सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे पाच तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची घटना शुक्रवारी (दि.१३) घडली. सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत कॉलेजरोडच्या प्रारंभी अनिता राहुल देशपांडे (३९, रा.जुना गंगापूरनाका) या त्यांच्या पतीसोबत दीपावलीच्या निमित्ताने फुले घेण्यासाठी आल्या असता एका काळ्या रंगाचे जॅकेट घातलेल्या, हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वाराने पल्सरवरून भरधाव येत देशपांडे यांच्या गळ्यातील सुमारे ५ तोळे वजनाची सोनसाखळी बळजबरीने हिसकावून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानुसार सरकारवाडा पोलिसांनी अज्ञात सोनसाखळीचोराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरात दररोज कुठल्यातरी एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरटे फरार होत आहेत. यावरून महिलांच्या गळ्यातील दागिने सुरक्षित नसल्याचे दिसून येते. सणासुदीच्या हंगामात महिला दागिने घालून घराबाहेर पडत असल्यामुळे चोरट्यांनी संधी साधण्यास सुरुवात केली आहे. यामुळे महिलांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपले दागिने सुरक्षित कसे राहतील, याकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.