नाशिक : अशोकस्तंभ येथील पशुंच्या गोळ्या-औषधविक्रीचे 'दर्पण' नावाच्या दुकानाचे मालक विशाल रमेश वासवानी हे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन मोटारीने घरी जात असताना तीघा संशयितांनी त्यांना रोखून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत एक लाखाची रोकड असलेली बॅग, मोबाइल हिसकावून मोटारीचे नुकसान करुन पळ काढल्याची घटना घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी मल्हारखाण झोपडपट्टीतून तीघांना अटक केली आहे.
शुक्रवारी (दि.२३) रात्रीच्या सुमारास वासवानी हे नेहमीप्रमाणे त्यांचे दर्पण मेडिकल बंद करुन कारने घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी संशयित आरोपी सुरज आहिरे (रा. लवकुश चाळ, सातपूर), अविनाश रणदिवे व त्याचा साथीदार (रा. मल्हारखाण), तसेच त्यांचा तीसरा साथीदार निलेश हिरामण झोले यांनी वासवानी यांना मारहाण करत त्यांच्याजवळील रोकडची बॅग हिसकावून कारचे नुकसान करत 'तू आमच्या गँगला ओळखत नाही का' असे धमकावून पळ काढला. याप्रकरणी वासवानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी संशयितांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करत वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी यांनी गुन्हे शोध पथकाला संशयितांचा माग काढण्याचे आदेश दिले. अवघ्या काही तासांत शनिवारी रात्रीपर्यंत तीघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक नाहीद शेख हे करीत आहेत.