सिडको : जेवणानंतर शतपावली करत घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील प्रत्येकी १८ व ४० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी येत हिसकावून पळ काढल्याची घटना सोमवारी (दि. ११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुभम पार्क परिसरात घडली. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सिडको परिसरातील कामटवाडे येथे राहणाऱ्या संगीता अतुल बोरटक्के (४१ , रा. संगीता पार्क) या सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जेवण करून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर आल्या होत्या. शुभम पार्कच्या दिशेने त्या पायी जात पुन्हा घराकडे परत येत होत्या. यावेळी अचानक त्यांच्या समोरून भरधाव वेगात एक दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आला आणि त्याने काही समजण्याच्या आतच महिलेच्या गळ्यातील ७२ हजार रुपये किमतीचे १८ ग्रॅम वजनाचे एक व एक लाख ६० हजार रुपये किमतीचे मोठे पेंडल असलेले ४० ग्रॅम वजनाचे एक असे एकूण दोन लाख ३२ हजार रुपयांचे दोन मंगळसूत्रे बळजबरीने खेचून धूम ठोकली. बोरटक्के यांनी आरडाओरड करत लोकांना मदतीसाठी बोलविण्यापर्यंत दुचाकीस्वार सोनसाखळी चोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. बोरटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.