: कोरोना बाधित रुग्ण निष्काळजीपणाने बिनधास्त बाहेर फिरून 'ब्रेक द चेन' चा अडथळा म्हणून सिद्ध होत असताना, अशा भटक्या बाधितांना वेसण घालायला नागरिकदेखील पुढे सरसावले आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या कोरोनाग्रस्तांची चर्चा दबक्या आवाजात न करता थेट प्रशासनाला सदर व्यक्तीचे नाव कळवून त्या व्यक्तीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यास भाग पाडल्याचा व्हिडिओ नांदगावी सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
प्रशासनाला माहिती देणाऱ्या व्यक्तीने, घराबाहेर कोरोनाची लागण झालेली व्यक्ती बिनधास्त फिरत असल्याने आम्हाला धोका निर्माण झाला आहे, असा मजकूर ग्रुपवर व्हायरल केल्यानंतरनंतर नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने चक्रे फिरवली आणि बाधिताला उपचारासाठी विलगीकरणात पाठविण्यात आले. बाधितांनी स्वत:ची काळजी घ्यावी आणि शेजाऱ्यांचीसुद्धा काळजी करावी, असा संदेश यातून देण्याचा उद्देश होता, असे सदर व्यक्तीने सांगितले.