नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येचा रोज नवा उच्चांक होत असून त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रशासनाला प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याच्या सूचना केल्या आहेत. इतकेच नव्हे तर आरोग्य नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईसाठी प्रसंगी एसआरपींची मदत घ्यावी असे पत्रच आयुक्त कैलास जाधव यांना दिले आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठा आणि नागरिकांवरदेखील अनेक निर्बंध आले असले तरी अनेक जण नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रसार तर होतोच, परंतु वाढत्या रुग्णसंख्येने पुन्हा जीवितहानी आणि अर्थकारण ठप्प होण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेने व्यापक उपाययोजना कराव्यात यासाठी महापौरांनी पत्र दिल्याचे नमूद केले आहे. शहरात साधारणत: एक हजार बाधित रोज आढळत आहेत. त्याचा विचार केला तर एकास तीस याप्रमाणे तीन हजार कोरोना चाचण्या राेज होणे आवश्यक आहे. त्यानुसार चाचण्या वाढवाव्यात, तसेच कोरोना चाचणी नमुन्यांचे लवकर निदान व्हावे यासाठी महापालिकेची प्रयोगशाळा तातडीने कार्यान्वित करावी अशी सूचना महापौरांनी केली आहे. गेल्या वर्षी कोरोना रुग्ण आढळल्यानंतर ज्याप्रमाणे महापालिका गांभीर्याने कारवाई करीत होती, त्याचप्रमाणे आताही फिल्डवर उतरून कार्यवाही करावी अशी सूचना महापौरांनी केली आहे.
कोरोना रोखण्यासाठी कोरोनीलसारखी प्रतिकारशक्ती वाढवणारी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी औषधे घेण्याबाबत जनजागृती करावी, नागरिकांत जागृतीसाठी फलक लावावेत, अशी सूचनाही महापौरांनी केली आहे.
इन्फो...
एकीकडे काेरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करताना दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणदेखील वाढवणे आवश्यक आहे. ४५ ते ६० वर्षे वयावरील नागरिकांना लसीकरणाबाबत जागृती करून द्यावी, त्याचबरोबर शहरात मुबलक लसींचा साठा मिळेल अशी व्यवस्था करावी, अशी सूचना महापौरांनी केली आहे.