मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मोठ्या उत्साहात मतदान झालं. राजकीय पक्षातील सर्वच नेतेमंडळींनी मतदान केंद्र गाठत मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदारांनाही मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मतदानाला दांडी मारली. भुजबळ दिवसभर आपल्या मतदारसंघात फिरत प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. पण, त्यांनी मतदानच केलं नाही, हा सर्वात चर्चेचा विषय ठरला.
“येवल्यात मी स्वत: निवडणुकीला उभा होतो, तर बाजूला नांदगावमधून पंकज भुजबळ उमेदवार होते. तिथून नाशिक 100 किलोमीटरवर आहे. मतदानाला गेले असतो तर जाऊन-येऊन पाच तास म्हणजेच अर्धा दिवस गेला असता. निवडणूक सुरु असल्याने मतदारसंघामध्ये थांबणेही महत्वाचे होते. आमचे मतदारसंघही मोठे-मोठे होते. त्यामुळे मतदानाला जाणं शक्य नाही,” असे भुजबळ यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना स्पष्टीकरण दिलंय.
नाशिकमध्ये मी जास्तीत जास्त फिरलो. नाशिकमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 15 उमेदवारांपैकी 12 जागा तरी आम्हाला कमीत कमी मिळतील, असा विश्वासही भुजबळ यांनी व्यक्त केला. एक्झिट पोल काहीही येवो, यावेळी निश्चितपणे सरकार बदलेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल, असा विश्वासही भुजबळांनी बोलून दाखवला. दरम्यान, भुजबळांनी मतदानाला दांडी मारल्याची वृत्त येताच, त्यांच्यावर सोशल मीडियातून टीकाही करण्यात आली.