मग महाआघाडीला सिंगल- डबल वॉर्डांची चिंता कशाला?
By संजय पाठक | Published: January 22, 2021 05:54 PM2021-01-22T17:54:29+5:302021-01-22T17:58:27+5:30
नाशिक : महापालिका निवडणूक वर्षभरावर असली तरी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्या आणि इच्छुक कार्यकर्त्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षही त्याला अपवाद नाहीत. आता राज्यापाठोपाठ नाशिक महापालिकेतील भाजपची सत्ता जाणारच, अशी अटकळ बांधून सारेच पक्ष स्वबळावर सत्तेची भाषा करू लागले आहेत. मात्र, दुसरीकडे प्रभाग रचना सिंगल किंवा डबल करताना आपल्या पक्षाची कुवत ओळखुूनच मागणी करू लागले आहेत. सर्वच पक्षांकडे स्वबळ असेल तर मग व्दिसदस्यीय प्रभागांची मागणी कशाला, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.
संजय पाठक, नाशिक : महापालिका निवडणूक वर्षभरावर असली तरी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्या आणि इच्छुक कार्यकर्त्यांचे बाहू स्फुरण पावत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षही त्याला अपवाद नाहीत. आता राज्यापाठोपाठ नाशिक महापालिकेतील भाजपची सत्ता जाणारच, अशी अटकळ बांधून सारेच पक्ष स्वबळावर सत्तेची भाषा करू लागले आहेत. मात्र, दुसरीकडे प्रभाग रचना सिंगल किंवा डबल करताना आपल्या पक्षाची कुवत ओळखुूनच मागणी करू लागले आहेत. सर्वच पक्षांकडे स्वबळ असेल तर मग व्दिसदस्यीय प्रभागांची मागणी कशाला, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.
राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना - काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीचे समीकरण अस्तित्त्वात आले. मुंबई महापालिकेसह राज्यात सर्वत्र महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढवणार असल्यांचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात ते शक्य होईल काय, याविषयी शंका आहे. त्याचे कारण म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील अशीच चर्चा होती. या निवडणुका प्रत्यक्षात पक्ष चिन्हावर लढवल्या जात नाहीत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी हेच पक्ष पॅनल करून एकमेकांच्या विरेाधात होते. महापालिकेच्या निवडणुकांना तर आणखी अवकाश आहे. परंतु शिवसेना ठीक आहे. परंतु सहा- सहा नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीनेदेखील स्वबळाची भाषा केली आहे.
स्वबळाची भाषा करणे ठीक. मात्र, प्रभाग रचना कशी असावी, याबाबत मतभेद आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक सदस्यीय प्रभाग रचनेची मागणी केली. तर शिवसेना आणि काँग्रेसने व्दिसदस्यीय प्रभाग पध्दतीची मागणी केली आहे. मुळात अशा प्रकारे आग्रह धरणारा पक्ष म्हणजे एकेकाळचे भाजप- सेनेचीच होती. राज्यात पहिल्यांदा युती सत्तेवर आल्यानंतर महापालिकेत त्रिसदस्यीय प्रभाग पध्दतीची रचना केली होती. त्यावरून ओरड झाली खरी मात्र नंतर कधी व्दिसस्यीस, तर कधी चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली. आता राज्यात सत्ता असताना भाजपने आणि त्याच वेळी शिवसेना युती म्हणून सत्तेत असताना २०१७ च्या निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग करण्यात आले. परंतु विद्यमान सरकारने ही रचना बदलण्याचे ठरवल्यानंतर खरे तर शिवसेना आणि काँग्रेस या देान्ही पक्षांनी
राष्ट्रवादीची री ओढायला हवी होती. स्वबळाइतके सक्षम उमेदवार असतील तर दोन उमेदवारांना घेऊन एकाच्या आधाराने दुसरा निवडून आणण्याची मुळातच गरज नाही. त्यातच एक सदस्यीय प्रभाग पध्दतीत भाजप मागे पडते म्हणून बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीला सुरूवात झाली असेल तर हा निर्णय भाजपच्या पथ्यावर पडणारा नाही काय, असा प्रश्न आहे. खरे तर स्वबळ असेल तर कोणत्याही प्रकारची रचना असेल तर लढण्यास सज्ज असलेच पाहिजे, परंतु कार्यकर्त्याच्या उत्साहात भर घालताना दुसरीकडे मात्र स्वबळाची वस्तुस्थिती दाखवली जात आहे, हे तितकेच खरे आहे.