नांदगाव : दारू पिऊन होणारे राडे शिविगाळ, त्यातून होणाऱ्या मारामा-या यामुळे अवघे गावही दारूला वैतागलेले.... कुठेतरी हे थांबले पाहिजे म्हणून पोही गावातल्या तरूणांनी एकत्र येऊन दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडल्या व गावठी दारूचे ड्रम रस्त्यावरच उलटे केले. गावात एकनाथ चव्हाण यांच्या मुलाची हळद होती. नवरदेव मुलगा अशोक एका किरकोळ बाचाबाचीच्या घटनेत जखमी झाल्याने त्याला दवाखान्यात दाखल करावे लागले हे सगळे दारूमुळे घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. म्हणून आधीपासून वैतागलेल्या गावकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला. सकाळीच गावातील तरु ण मोठ्या संख्यने जमले व पोलीस पाटील संजय राठोड यांच्या पुढाकारातून दारूबंदी झालीच पाहिजे अशा निर्धाराने दारू नष्ट करण्यात आली. कन्नड येथून पोही गावी मोठ्या प्रमाणात गावठी दारू विक्र ीसाठी येत असते. दारू पिणारा कुठलाही कामधंदा करीत नाही. पर्यायाने घरातल्या महिलांना कामासाठी बाहेर पडावे लागते. त्यामुळे अनेक भगिनीही त्रस्तच होत्या. दारूबंदीची सामूहिक शपथ घेण्यात आली. पोलीस पाटील संजय राठोड, उपसरपंच भाऊलाल चव्हाण, माजी उपसरपंच भास्कर राठोड, रोहिदास राठोड, रंगनाथ राठोड, मोहीम राठोड, देवराम चव्हाण आदी प्रमुख मंडळींसह गावातले तरूण रवी राठोड, ज्ञानेश्वर राठोड, सुनील चव्हाण, प्रवीण राठोड, योगेश चव्हाण आदी दारूबंदी मोहिमेत सहभागी झाले होते.
पोही ग्रामस्थांकडून मद्याचे ड्रम नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 2:27 PM