कळवण : कोरोना निर्मूलनासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे तालुक्यातील अतिदुर्गम भागातील २०० आदिवासी कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या घरांपर्यंत जाऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू व कळवण उपजिल्हा रुग्णालयात ५० हजार रुपयांची कोरोना प्रतिबंधक सुरक्षा साधने देऊन कळवणचे सामाजिक कार्यकर्ते रमेश शिरसाठ यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.तालुक्यातील उंबरदे, तीळगव्हाण, जोपळेपाडा, खेराट पाडा, ठाकरे पाडा, महाल या अतिदुर्गम भागातील आदिवासी गावांमध्ये ज्यांना सध्या हाताला काम नाही अशा २०० कुटुंबीयांचा शिरसाठ यांनी दोन किलो तेल, साखर, मूगडाळ, मसूरडाळ, शेंगदाणे, हळद, मसाला, मीठ, गूळ आदी वस्तूंचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले.लॉकडाउनमुळे या सर्वांसमोर अन्नधान्याची मोठी समस्या निर्माण झाली होती, ती या निमित्ताने दूर झाली आहे.रोजंदारीवर काम करणाऱ्या या आदिवासी बांधवांच्या हातातील पैसे संपले, साठवलेले धान्यही संपले, आता करायचे तरी काय व जायचे तरी कोणाकडे, या चिंतेत हे सर्व बांधव होते. कोणीही या मजुरांची साधी विचारपूसही करायला तयार नव्हते अशावेळी शिरसाठ हे मदतीला धाऊन गेल्यामुळे त्यांचा अन्नधान्याचा अन् उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. शिवाय कळवण उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंध सुरक्षा साधनांचा तुटवडा असल्याने शिरसाठ यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोडियम हायड्रोक्लोराईड, हॅण्ड सॅनिटायझर, पीपीई किट सुरक्षा साधने दिली आहेत.
कळवणच्या शिरसाठ यांनी जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 10:53 PM