नाशिक : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शहरातील औद्योगिक संघटनांनी सामाजिक बांधिलकीतुन मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. शासकीय विश्रामगृह येथे शहरातील औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ते मंगळवारी (दि.30) बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश जगदाळे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव, पोलिस उपायुक्त अशोक तांबे, मनपा नोडल अधिकारी डॉ. आवेश पल्लोड, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, पोलिस सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, क्रेडाईचे रवी महाजन, निमाचे अध्यक्ष शशीकांत जाधव, वकील असोसिएशनचे ॲड. नितीन ठाकरे, उद्योजक प्रदीप पेशकार, आयएमएचे डॉ. समीर चंद्रात्रे यांचेसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील संसर्गबाधितांच्या वाढत्या संख्येबाबत भुजबळ यांनी मनपाने तयार केलेल्या डॅशबोर्ड द्वारे माहिती घेतली. शहरातील 20 ते 40 या वयोगटातील बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याने त्यांनी काळजी व्यक्त केली. क्रेडाई या संस्थेने स्वतःहून मदत करण्याचे औदार्य दाखवले तसे इतर औद्योगिक संस्थांनी दाखवावे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून कोरोनाच्या लढ्यात उपयोगी पडेल अशी योग्य ती साधनसामुग्री पुरवावी. शासनाकडे निधीची कमतरता नाही. मात्र, या संकटकाळात सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत समाजाप्रती असलेले आपले औदार्य दाखवण्याचे आवाहन ही भुजबळ यांनी यावेळी केले.
सामाजिक बांधिलकी जपा ; कोरोना संकटात मदतीसाठी पालकमंत्र्यांचे औद्योगिक संघटनांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 7:38 PM
शहरातील औद्योगिक संघटनांनी सामाजिक बांधिलकीतुन मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून कोरोनाच्या लढ्यात उपयोगी पडेल अशी योग्य ती साधनसामुग्री पुरवावी. असेही त्यांनी सुचीत केले आहे.
ठळक मुद्देकोरोना विरोधी लढ्यासाठी औद्योगिक संघटनाना मदतीचे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांची व्यावसायिकांसोबत बैठक