देवळा : लॉकडाऊन नंतर आता फक्त अत्यावश्यक सेवा देणारे किराणा, अॅग्रो, मेडीकल, खाजगी दवाखाने, दूध, भाजीपाला विक्र ीची दुकाने सुरू आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देवळा शहर व ग्रामीण भागातील काही दुकानदारांनी सोशल डिस्टन्सींगची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू केली आहे. यामुळे कोरोनाविषयी काही दुकानदार गंभीर असल्याचे चित्र एकीकडे दिसत असतानाच अद्यापही बहुतांश दुकानात सोशल डिस्टन्सींगकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.कोरोना विषाणू संसर्ग टळावा यासाठी वाजगाव ग्रामपंचायतीने गावातील सर्व दुकानदारांना योग्य त्या सुचना दिल्या असून सुचनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी गावातील शिवाजी चौकात नियमतिपणे ध्वनीक्षेपकावरून सुचना देण्यात येत असून मुंबई, पुणे, आदी शहरातून गावात आलेल्या नागरीकांची माहीती ग्रामपंचयातीला देण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. तसेच स्वच्छता, सोशल डिस्टन्सींग आदी कोरोना विषाणूबाबत घ्यावयाच्या दक्षतेबद्दल सुचना देण्यात येतात. वाजगाव येथील किराणा दुकानदाराने येणार्या ग्राहकांना हात धुण्यासाठी पाणी, व साबनाची व्यवस्था केली असून ग्राहकांना वस्तू देण्यापूर्वी कटाक्षाने साबण लावून हात धुण्यास सांगितले जाते, तसेच सोशल डिस्टन्सींगचे कसोशीने पालन करण्यात येते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सद्या सोशल डिस्टंसींग हाच पर्याय आहे असे असतांना व याबाबत सातत्याने जनजागृती केली जात असतांना मात्र अद्यापही काही दुकानात सोशल डिस्टन्सींगचे पालन केले जात नाही असे नागरीकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागात सोशल डिस्टंसिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 12:49 PM