कळवण : कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) ठेवण्याच्या आवाहनानुसार कळवण मर्चंट को-आॅप. बँकेसह नागरी व ग्रामीण बिगरशेती पतसंस्थांमध्ये काळजी घेतली जात असल्याचे दिसत आहे.कळवण व्यापारी महासंघाने याबाबत पुढाकार घेऊन व्यापारी व व्यावसायिक यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन सातत्याने केले आहे. त्यामुळे शहरातील औषध दुकान, किराणा दुकानांबरोबरच भाजी विक्रेत्यांच्या दुकानांसमोर पांढरे पट्टे मारून ग्राहकांना एकमेकांत तीन फुटांचे अंतर ठेवण्यास सांगितले जात आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद करण्यात आली आहेत. पण अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वस्तूंच्या दुकानांसमोरच गेल्या काही दिवसांपूर्वी गर्दी दिसू लागली होती. प्रशासनाने गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर तात्पुरता भरणारा भाजीबाजाराचा गाशा गुंडाळावा लागला. प्रशासनाकडून ‘सामाजिक अंतर’चा आग्रह धरला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, औषधी दुकान, बँका, पतसंस्था, किराणा दुकान, भाजी विक्रेत्यांच्या दुकाने यासमोर पांढरे पट्टे मारून तीन फुट अंतर ठेऊन उभे राहण्याची सूचना देण्यात आली आहे. तर बँकेमध्ये वेगवेगळ्या दोन रांगा लावून, एकमेकांत अंतर ठेवून उभे राहायला सांगितले जात आहे. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एकावेळी ४ ते ५ जणांना आतमध्ये प्रवेश दिला जात आहे, तर एटीएमबाहेर गर्दी करू नका, असे सांगितले जात आहे. बहुतांश एटीएममध्ये एकावेळी एका व्यक्तीलाच आत जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नियमांची लॉकडाउनमध्ये अंमलबजावणी होताना दिसत आहे.
कळवणला बँकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 10:38 PM