नाशिक : ‘व्हॅलेंटाईन डे’ आज सर्वत्र तरुणाई साजरा करत असून या दिनाने ‘प्रेम सप्ताह’चा समारोप होणार आहे. व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. या दिनाची वर्षभर तरुणाई आतुरतेने वाट पाहत असते. तरुणाईसाठी जणू उगविला सोन्याचा दिन असाच काहीसा आजचा दिवस.
प्रेम संदेशाचे एकापेक्षा एक सरस वॉलपेपर पोस्ट केले जात आहेत. यासोबत मराठी प्रेमाच्या साहित्यामधील विविध कव्यपंक्तींचीही उधळण सोशल मिडिवावर नेटिझन्स्कडून होताना दिसत आहे. तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले आहे. शहरातील पिकनिक स्पॉट गजबजले आहे. प्रत्येक जण गुलाबपुष्प, टेडी, रेडरोझ बुके घेताना दिसून येत आहे.
आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रेमाचे प्रतिक गुलाब देऊन तसेच विविध गिफ्ट देऊन प्रेमभावना व्यक्त केल्या. शहरातील सोमेश्वरजवळील दुधसागर धबधबा जरी कोरडा असला तरी त्या परिसराची तरुणाईला नेहमीच भुरळ पडत आली आहे.
आजही हा परिसर सकाळपासून गजबजला होता. तसेच गंगापूर धरणाच्या परिसरातील सावरगाव बॅकवॉटरलाही तरु णांनी शांत, नितल, निळेशार पाण्याच्या अथांग पाणीसाठ्याच्या साक्षीने प्रेमभावना व्यक्त केल्या. या वाटेतील महापालिकेच्या वसंत कानेटकर उद्यानातही तरुणाईची गर्दी झाली होती.
हार्ट शेप, गुलाबाचे बुकेच्या छायाचित्रांसह प्रेमभावना व्यक्त करणारा शब्दसंदेशांची दिवसभर देवाणघेवाण होत होती. तरुणांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना ‘हॅप्पी व्हॅलेंटाईन डे’ केले.