सतीश डोंगरे ।नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या गजलक्ष्मीची आर्त हाक जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता सोशल मीडियावर चळवळ उभी राहिली आहे. ‘लक्ष्मी’च्या नावाने एका संकेतस्थळावर पिटीशन साइन करून ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील गजलक्ष्मीचा मूक आक्रोश मांडण्यात आला आहे.या पिटीशनला जगभरातील प्राणिमित्रांनी साद घातली असून, तिच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी वाट्टेल ती मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, वनविभागाची अनास्था कायम असल्याने लक्ष्मीची सुटका अखेर केव्हा होणार, हा प्रश्न कायम आहे. अॅनिमल वेल्फेअर अॅण्ड अॅँटी हॅरेशमेंट सोसायटी अर्थात ‘आवास’ या संस्थेचे अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांनी लक्ष्मीच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारत तिच्या सुटकेची मागणी केली. तसेच एका संकेतस्थळावर ‘लक्ष्मी’ या नावाने पिटीशन साइन केले. या पिटीशनला भारतातील विविध राज्यांमधील प्राणिमित्रांसह अमेरिका, सिरीया, बांगलादेश, पाकिस्तान, इस्त्रायल, आफ्रिका यांसारख्या देशांमधील प्राणिमित्रांनीही लक्ष्मीच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत देण्याची तयारी दर्शविली आहे.केरळ, तामिळनाडू या भागातील हत्तींचे पालनपोषण करणा-यांनी तर नाशिकमध्ये येऊन लक्ष्मीच्या जखमांवर उपचार करण्याचे बोलून दाखविले आहे, तर एका प्राणिमित्राने या प्रकरणात कायदेशीर पेच निर्माण झाल्यास न्यायालयात लढा देऊ, पर्यायाने त्यासाठी वकीलही उभा करू, असेही बोलून दाखविले आहे. या पिटीशनला काही तासांतच सुमारे अडीच हजार लोकांनी साइन केले असून, सोशल मीडियावर याबाबतची एक मोठी चळवळच उभी राहताना दिसत आहे. समाजातून दबाव वाढत असतानाही वनविभागाच्या या कुचराईमुळे संतापाचे वातावरण असून, लक्ष्मीचे खरे गुन्हेगार कोण, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
ALSO READ : स्वार्थी दुनियादारी : विव्हळणाऱ्या ‘गज’लक्ष्मीचा मूक आक्रोशवनमंत्र्यांनीच दखल घ्यावीराज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच या प्रकरणी लक्ष केंद्रित करून लक्ष्मीची मुक्तता करावी अशी मागणी आता पुढे येत आहे. ‘जय’ वाघाच्या शोधासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेतला होता, तसाच पुढाकार लक्ष्मीच्या सुटकेसाठीही घ्यावा. कारण लक्ष्मीच्या शरीरावरील मोठमोठ्या जखमा ठळकपणे दिसत असतानाही वनविभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. अशात मंत्रालयातूनच आदेश काढले गेल्यास अधिकारी लक्ष्मीच्या मुक्ततेसाठी पुढे येण्याचे सौजन्य दाखवतील, अशी अपेक्षा प्राणिमित्रांकडून व्यक्त केली जात आहे.
तातडीने उपचाराची गरजगजलक्ष्मीच्या शरीरावरील जखमांचे प्रमाण पाहता तिच्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. कारण जखमांचा संसर्ग झाल्यास ते सर्वांच्याच दृष्टीने धोकादायक ठरू शकते. सोशल चळवळीच्या माध्यमातून देशातील विविध भागांमधील प्राणिमित्रांनी तिच्या उपचाराची जबाबदारी स्वीकारली आहे. आता वनविभागाने तत्परता दाखविण्याची गरज आहे. कारण संबंधित व्यक्तीची लक्ष्मीवर उपचार करण्याची मानसिकता नसून तो केवळ पोटापाण्याची व्यवस्था म्हणून तिचा वापर करीत आहे. आता वनविभागाच्या कारवाईची प्रतीक्षा आहे.- गौरव क्षत्रिय, अध्यक्ष, आवास