नाशिक : शहरात पसरणारे महामारीचे सावट पाहता आदिवासी गावांमध्ये या महामारीचे लोण पोहोचू लागले आहे. या आजाराची झळ ग्रामीण भागामध्ये तीव्र होऊ नये, यासाठी आदिवासी पाड्यांवरही लसीकरण करण्यासाठी मानव अधिकार संवर्धन संघटन संस्थेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.
महामारीपासून गावाचे संरक्षण होण्यासाठी आदिवासी ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे आहे. आदिवासी भागात लसीकरणाविषयी अतिशय भीती अंधश्रद्धा व गैरसमज पसरलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मानव अधिकार संवर्धन संघटन संस्थेने मागील १५ दिवसांपासून पेठ येथील कायरे, सावरणा झरी, बोरीची बारी कुंभाळे या गावात जनजागृती व प्रत्यक्ष लसीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमातील पहिला टप्पा म्हणून सुरुवातीला गावामध्ये जाऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. लसीकरणाविषयी भीती गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष लसीकरण हाती घेत मानव अधिकार संवर्धन संघटन संस्थेतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभाळे यांच्या मदतीने काम सुरू करण्यात आले. मंगळवारी (दि. २५) सकाळी कायरे, पेठ येथील मंदिरामध्ये प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये गावातील लसीकरणला तीव्र विरोध असलेल्या लोकांचे समुपदेशन करून त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. सुरुवातीला मिश्र प्रतिसाद आल्याने ४५ वयावरील २२ ग्रामस्थांचे लसीकरण केले गेले. त्यात २१ मे रोजी झालेल्या पहिल्या लसीकरण मोहिमेमध्ये २४ लोकांचे लसीकरण झाले. गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात अजून साधारण १४५ नागरिक ४५ वर्षांच्या पुढचे लस घेणाऱ्यांच्या यादीत आहेत, या पैकी ४६ लोकांचे संस्थेच्या प्रयत्नांनी लसीकरण करण्यात आले. तसेच त्यापूर्वी या गावामध्ये अंगणवाडी सेविका, आशाताई आणि अन्य फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
इन्फो
दोन महिन्यांपासून सहभाग
हा प्रकल्प गेल्या २ महिन्यापासून नाशिकच्या कोविड मदतकार्यात सक्रिय आहे. गावातील लोकांशी संवाद साधण्यासाठी मुकुंद दीक्षित आणि वासंती दीक्षित उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभाळा डॉ. चारुडे यांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेकडून श्यामला चव्हाण, डॉ. मिलिंद वाघ, मुक्ता कावळे, प्रणित पवार, तल्हा शेख, निखिल भुजबळ, सई कावळे यांनी काम पाहिले.