सातपूर : लॉकडाउनच्या काळात गोरगरिबांना अन्नदान करणाऱ्या आयमाच्या माजी अध्यक्षांवर मद्यपी समाजकंटकांकडून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. असे हल्ले होणार असतील तर समाजसेवा करायची की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. असंख्य परप्रांतीय कंत्राटी कामगार बेरोजगार झाल्याने अशा कामगारांना आयमा या औद्योगिक संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष वरुण तलवार यांचे वडील विजय तलवार हे सामाजिक बांधिलकी जोपासून आपल्या पाथर्डी फाट्यावरील निवासस्थानी गेल्या महिनाभरापासून बिस्किटांचे पुडे व अन्नदान करीत आहेत. नेहमीप्रमाणे अन्नदान करीत असताना रविवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी दोन युवक आले. विजय तलवार यांनी त्यांची विचारपूस केली असता त्यांनी परप्रांतीय असल्याचे सांगितल्याने तलवार यांनी बिस्किटांचे पुढे दिले. पाणी मागितले असता पाणीही दिले. काही वेळाने ते पुन्हा आले. आमचे काही लोक उड्डाणपुलाखाली असल्याचे सांगितल्याने तलवार यांनी तेथे जाऊन पाहिले असता एक टोळके मद्यपान करीत असल्याचे दिसले. ते परप्रांतीय नव्हते तर स्थानिकच होते. तुम्ही असे करू नका. उघड्यावर मद्यपान करू नका, असे सांगून त्यांना हटकले असता या टोळक्यातील काहींनी तलवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तलवार यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांचा मुलगा आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्याला आठ टाके घालण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.या घटनेची माहिती अंबड पोलीस ठाण्यात दिली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी आपल्या कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी हजर झाले. वरुण तलवार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.----गेल्या दीड महिन्यापासून वडील विजय तलवार हे गोरगरीब लोकांना नियमित अन्नदान करीत आहेत. रविवारी काही मद्यपी समाजकंटकांनी हल्ला करून जे कृत्य केले ते योग्य नाही. परंतु अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार चौधरी हे कर्मचाºयांसह ताबडतोब घटनास्थळी आले व आरोपींवर लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. असे प्रकार आपल्या शहरात घडू नये एवढीच अपेक्षा आहे.- वरुण तलवार, अध्यक्ष, आयमा
समाजसेवा पडली महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 10:58 PM