नाशिक : कोरोनाबाधित रुग्णाच्या भीतीपोटी टाकण्यात येणाऱ्या बहिष्काराच्या घटना सुन्न करणाºया ठरतात. नाशिकमध्ये तर एका वैद्यकीय अधिकाºयाला कोरोना झाल्याचे कळल्यानंतर त्यांच्या स्वत:च्या घरी क्वारंटाइन होण्यास आसपासाच्या रहिवाशांनी विरोध केला. मात्र, गंगापूररोडवरील ज्या परिसरात ही घटना घडली तेथून अवघ्या अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सुयोजित गार्डनमध्ये वेगळाच अनुभव बाधिताच्या कुटुंबीयांना आला. संबंधित बाधित हे मालेगावी असल्याने त्यांच्या दोन मुलींचा आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळ करणाºया या सोसायटीने या कुटुंबाला मानसिक उभारी तर दिलीच शिवाय बहिष्काराची भाषा करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. संसर्ग जन्य आजार असल्याने तो वाढत आहे. अशावेळी बाधिताला आधार देणे सोडून त्याला बहिष्कृत करण्यासारखे प्रकार होत आहे, त्यामुळे शासनाकडूनही ‘रोगास लढा, रोग्याशी नाही’ असे आवाहन केले जात आहे. परंतु त्यानंतरदेखील अनेक कटू घटना घडत आहे. मात्र, शहरातील सुयोजित गार्डनमधील सोसायटी-धारकांनी मात्र, त्याला छेद दिला आहे आणि सोसायटी नव्हे कुटुंब असे दाखवून दिले आहे.कोरोनाच्या बाबतीत सध्या मालेगाव हॉट स्पॉट बनला आहे. तेथे कर्तव्य बजावणाºयांनाही लागण झाल्याने काम करणे कठीण झाले आहे. मात्र, अशा स्थितीतही मालेगाव महापालिकेत काम करणाºया एका उच्चपदस्थाला या आजाराचा संसर्ग झाला. त्यामुळे सर्व कुटुंबच हादरले. मालेगाव येथे शासकीय निवासस्थानी हा अधिकारी क्वारंटाइन असला तरी त्यांच्यादेखभाल आणि काळजी पोटी पत्नीनेदेखील धाव घेतली. मात्र, त्यापूर्वी त्यांच्या दोन मुलींच्या सांभाळण्याचा प्रश्न होता. यातील एक आठ वर्षांची तर दुसरी जेमतेम पंधरा सोळा वर्षांची. त्यांना सांभाळणे आणि त्यापेक्षा मानसिक आधार देण्याचे काम खूप महत्त्वाचे होते. सोसायटीने ते लिलया करण्याची तयारी दर्शविली. आपल्याच कुटुंबातील कोणाला आजार झाला तर आपण असे वागणार का, हे साधे सोसायटीचे सूत्र असल्याने त्यांनी त्या अधिकाºयाच्या मुलींची जबाबदारी स्वीकारली.सोसायटीत १६२ सदनिका असून, त्यातील प्रत्येक घर म्हणजे जणू आपलच हक्काचं घर असे या सोसायटीत वातावरण असल्याने त्या मुलींना सहज सांभाळताना मानसिक उभारी देण्याचे कामदेखील सोसायटीवासीयांनी केले. सोसायटीतील वातावरण अत्यंत कौटुंबिक असल्याने त्यांना वेगळेपणा वाटत नाही ना सोसायटीतील कोणाला! आपल्या घरातीलच मुली असल्यागत त्यांचे लाड होतात आणि हट्टही पुरविला जातो. आई-वडील मालेगावात, परंतु मुली मात्र सोसायटीच्या कुटुंब कबिल्यात रमलेल्या असे अनोखे चित्र निर्माण झाले आहे.
बाधिताच्या मुलींना सोसायटी देते मानसिक उभारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:24 AM