ऑनलाईन पुस्तकांची मागणी वाढली
नाशिक: लाॅकडाऊनमुळे महाविद्यालयांवर निर्बंध आले असले तरी यावर्षी प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी तसेच तत्सम विद्याशाखांचे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. यंदा महाविद्यालयांमधून पुस्तके उपलब्ध होऊ शकलेली नाहीत. शिवाय पुस्तकालयदेखील बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पुस्तके खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शैक्षणिक पुस्तकांची मागणी वाढली आहे.
चोवीसतास पेट्रोल पंपांवर मध्यरात्री गर्दी
नाशिक: अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल देण्यात यावे, असे निर्बंध असल्यामुळे अनेक वाहनधारकांना पेट्रोल मिळत नसल्याने अशा वाहनधारकांनी शक्कल लढवली आहे. शहरातील जे पेट्रोलपंप चोवीस तास सुरू राहतात तेथे रात्री किंवा पहाटेच्या सुमारास पेट्राेल भरून घेत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अनेक दुचाकी, चारचाकी रस्त्यावर दिसतात.
मेडिकल दुकानांमध्येही ब्रेड, अंडी
नाशिक: लॉकडाऊनमुळे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असून, फक्त मेडिकलची दुकाने सुरू आहेत. त्यामुळे मेडिकलच्या दुकानांमध्ये सध्या अंडी, ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्किटे, विक्रीला वेग आला आहे. इतर दुकाने बंद असल्यामुळे ग्राहकही मेडिकलच्या दुकानात अशा प्रकारचे साहित्य खरेदी करीत असल्याने त्यांची सोय झाली आहे.