नाशिक : स्मार्ट सिटी अभियानात नाशिकचा समावेश झाल्यानंतर गठित झालेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीमार्फत नववर्षाच्या प्रारंभी ‘प्रोजेक्ट गोदा’सह काही प्रकल्पांची कामे हाती घेण्यात येणार असून, त्यात कालिदास कलामंदिरसह जुन्या नाशकातील कथडा रुग्णालयात सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली. स्मार्ट सिटी अंतर्गत सद्यस्थितीत कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालनाच्या नूतनीकरणाचे तसेच नेहरू उद्यानाच्या पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. पुढील महिन्यात अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका यादरम्यान स्मार्ट रोडच्या कामाची निविदाप्रक्रिया पार पाडली जाणार असून, स्मार्ट पार्किंगच्याही निविदा काढण्यात येणार आहेत. याशिवाय, सौर ऊर्जेवर काही प्रकल्प चालविण्यात येणार आहेत. त्यासाठी महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन, पंचवटीतील ज्ञानेश्वर अभ्यासिका, पंचवटीतील महापालिकेचे विभागीय कार्यालय आणि जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन अर्थात कथडा रुग्णालयात सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ‘प्रोजेक्ट गोदा’ या अंतर्गत ५१५ कोटींचा प्रकल्प असून, त्यात प्रामुख्याने, लेझर शो, फाउंटन, सायकल ट्रॅक, हनुमानघाट ते रामवाडी पूल आणि चिंचबन ते हनुमानवाडी पूल, सुंदरनारायण मंदिरालगतचा घाट तसेच होळकर पुलाखाली अॅटोमॅटिक गेट बसविण्यात येणार आहेत. याशिवाय नदी स्वच्छता प्रकल्पही राबविले जाणार आहेत. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सदर प्रकल्पांच्या कामांंसंदर्भात निविदाप्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहितीही थविल यांनी दिली.
सौर ऊर्जेवर कालिदास, कथडा रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:41 AM