लक्ष्मण सोनवणे
बेलगाव कुऱ्हे :विज्ञानामुळे कृषिक्षेत्रात आज मोठ्या प्रमाणावर प्रगती होत आहे. विविध यंत्रे व उपकरणांचा शोध लागल्यामुळे शेतीची कामे करणे सुलभ व सोपे झाले आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन शेतीसाठी अतिशय उपयोगी सौरऊर्जेवर चालणारे मिनी रोटर तयार करण्यात एका विज्ञान शिक्षकास यश आले आहे.इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शिक्षक नितीन इंगळे व नववीत शिकणारा प्रशांत गाढवे यांनी अथक परिश्रमातून शेतकरी व पोल्ट्री व्यावसायिकांसाठी बहुपयोगी सौरऊर्जेवर चालणारे ‘मिनी रोटर’ यंत्राची निर्मिती केली आहे. नाशिक येथे झालेल्या इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सदर या यंत्रास जिल्हास्तरावर बक्षीस प्राप्त झाले असून, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी या यंत्राची निवड झाली आहे.