सिन्नर : देवळाली कॅम्प येथे कार्यरत असलेल्या व मूळ बडवेल (आंध्रप्रदेश) येथील ४० वर्षीय जवानाचा शिर्डीकडे दुचाकीवर जात असताना दुचाकी स्लीप होऊन झालेल्या अपघातातमृत्यू झाला. सिन्नर-घोटी महामार्गावर रविवारी (दि. २५) दुपारी एक वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. सदर जवानाने डोक्यावर हेल्मेट घातलेले होते, परंतु अपघातात हेल्मेट बाजूला पडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
देवळाली कॅम्प येथे हवालदार असलेला जवान बाळकृष्ण नरसिमल नल्लम (४०) हे रविवारी दुपारी दुचाकीने (क्रमांक एमएच १५ - डीजे ७३२०) देवळाली कॅम्पकडून शिर्डीकडे जात होते. सिन्नर-घोटी महामार्गावर दुपारी एक वाजेच्या सुमारास सोनांबे शिवारात रखमाई लॉन्सजवळ त्यांची दुचाकी स्लीप होऊन ते घसरून पडले. त्यांना तातडीने सिन्नरच्या खासगी रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपचार सुरू असताना या जवानाचे निधन झाले. बाळकृष्ण नल्लम यांनी डोक्यावर हेल्मेट घातलेले होते. मात्र, हेल्मेट बाजूला पडून त्यांच्या डोक्याला मार लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार नंदू कुऱ्हाडे अधिक तपास करीत आहेत.