नाशिक : संरक्षण क्षेत्रात भारत अधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम होत असताना पाकिस्तान, चीन अथवा अन्य कोणत्याही राष्ट्राची थेट युद्ध करण्याची हिंमतनाही, त्यामुळेच वेगवेळ्या पद्धतीने छुप्या लढाया लढल्या जात असून चीनने केलेला कोरोना विषाणूचा प्रसारही त्याचाच भाग आहे. अशा कट कारस्थानांचा अंत हा कलियुगांच्या शेवटी महाभयंकर महाभारताच्या महायुद्धाने होणार असून त्यासाठी देशाच्या तरुण जवानांनी सदैव सज्ज राहण्याचे आवाहन मेजर जनरल (निवृत्त) गगन दीप बक्षी यांनी केले.
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १२) रावसाहेब थोरात सभागृहात डॉ. मुंजे स्मृती व्याख्यानमालेचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर. ए. लिटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सीएचएमएसचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांच्यासह व्यासपीठावर नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपाद नरावणे, कार्यवाह हेमंत देशपांडे आदी उपस्थित होते. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘जीओपॉलिटिक्स इन २०३० इंडिया’ विषयावर गुंफताना मेजर जनरल बक्षी यांनी भारताला अंतर्गत जातीय व्यवस्थेपासूनच अधिक धोका असल्याचे नमूद केले. देशात मतांवर डोळा ठेवून जाती-पातीचे राजकारण केले जात असल्याने जातीय आरक्षण आणि त्यामुळे निर्माण होणारा जातीय भेदाभेद अजूनही कायम असल्याची खंत व्यक्त केली. राखीव जागांचा निकष हा आर्थिक क्षमतेवर असावा, गरीब, श्रीमंत असा भेद नकोच सर्व समान हवे, प्रथम आम्ही सर्व भारतीय आहोत, ही भावना मनी सर्व घटकांमध्ये रुजली तर भारत एकसंघ राष्ट्र म्हणून अधिक बलशाली होऊ शकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, दिवंगत सीडीएस बिपीन रावत यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्यासोबत सैन्यदलातील रावत व अन्य अधिकाऱ्यांच्या कार्यावरही प्रकाशझोत टाकला. मेजर विक्रांत कावळे यांनी सूत्रसंचालन केले.
--
धर्मरक्षणार्थ हिंसेचे समर्थन
मेजर जनरल गगन दीप बक्षी यांनी अहिंसावादी गांधी विचारधारेवर टीका करतानाच इंग्रजांना भारतात १८५७ सारखा उठाव नको असल्याने त्यांनीच महात्मा गांधींच्या अहिंसात्मक भूमिकेचा पुरस्कार करीत त्यांना प्रसिद्धी मिळवून दिल्याचा आरोप केला. आतापर्यंत विचारवंतांनी केवळ ‘अहिंसा परमो धर्म’ एवढाच श्लोक सांगितला परंतु, त्यापुढील ‘धर्म हिंसा तथैव च’ हा भाग सांगितला नाही. त्याचा अर्थ अहिंसा मनुष्याचा धर्म असला तरी धर्माच्या रक्षणार्थ केलेली हिंसा त्याहून श्रेष्ठ असल्याचे त्यांनी यावेळी नमूद करताना राष्ट्र संरक्षण हा सैनिकांचा धर्मच असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
-------
आजचे व्याख्यान
विषय- जीओपॉलिटिक्स इन२०३० इंडो पॅसिफिक
वक्ते- संरक्षणतज्ञ-नितीन गोखले
वेळ- सायंकाळी ५.३० वा.